Breaking News

हिवरगाव टोलनाक्यावर ‘सेना स्टाईल’ने ठिय्या आंदोलन


संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गाच्या हिवरगाव येथील टोलनाक्यावर आज {दि. २३} शिवसेनेच्यावतीने ‘सेना स्टाईल’ आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी टोलच्या मनमानी विविध मागण्या मांडत प्रशासनाला धारेवर धरले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास खा. सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी आदींसह उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक आणि ग्रामस्थ या आंदोलनात मोठ्या संख्यने सहभागी झाले. यावेळी हिवरगाव येथील टोल नाका प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. .
दरम्यान, यापूर्वी दि. १८ एप्रिल रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी टोल प्रशासनाला विविध मागण्यांसंबंधीचे निवेदन दिले होते. २२ एप्रिलपर्यंत मागण्यांची दखल घेऊन त्या मान्य न केल्यास २३ एप्रिल रोजी शिवसेना आंदोलन करणार असल्याचा इशारा खेवरे यांनी सदर निवेदनाद्वारे दिला होता. दरम्यानच्या काळात टोल प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही व मागण्यांची दखलही घेण्यात आली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान टोल नाक्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहनांना मोफत सोडण्यात आले. यावेळी आंदोलनातील काही कार्यकर्त्यांकडून टोलच्या मालमत्तेला नुकसान पोहचली. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. शिवसैनिक हिवरगाव टोल नाक्यावर पोहचताच पोलिसांचा मोठा फौज फाटा त्याठिकाणी हजर झाला. यामध्ये पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, तालुका पो. नि. सुनील पाटील यांच्यासह अधिकारी घटनास्थळी हजार झाले. तहसीलदार साहेबराव सोनावणे यांनी आंदोलक शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. यावेळी टोल प्रशासनांकडून तूर्तास स्थानिक वाहनांना विना अडथळा टोल न आकारात सोडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तसेच एम. एच. १७ पासिंगच्या गाड्या टोलमुक्त करण्यासंदर्भात दि. २९ रोजी टोल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांची तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांबरोबर कार्यालयात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचवेळी शिवसेनेने केलेल्या इतर सर्व मागण्यांना त्यांनी तोंडी मंजुरी दिली असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे. आंदोलनात खा. सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी यांची भाषणे झाली. पप्पू कानकाटे, रामभाऊ राहणे, अमित चव्हाण, भाऊसाहेब हासे, अस्लम शेख, राजा देवकर, आप्पा शिंदे, राजा सातपुते, शीतल हासे, बाळू कवडे, राजू सोनवणे, सोमनाथ कानकाटे, आबासाहेब पवार, योगेश बिचकर, विजय जैस्वाल, आप्पा केसकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.