Breaking News

भारत बंदला हिंसक वळण मध्यप्रदेशात चार तर राजस्थान एक जणांचा मृत्यू

नवीदिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटीवर दिलेल्या निर्देशांविरोधात मंगळवारी होत असलेल्या भारत बंदचे देशभरात पडसाद पाहायला मिळाले. मध्यप्रदेशात भारत बंदला गालबोट लागलं असून, हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, तर राजस्थानमधील अलवरमध्ये एक जणाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी गाड्या आणि दुकानांची मोडतोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. ग्वाल्हेरमधील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारत बंद अंतर्गत होत असलेल्या आंदोलनांनी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तत्काळ अटकेची तरतूद शिथील करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्याचा परिणाम देशभरात पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी होत असलेल्या आंदोलनांमुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. आत्तापर्यंत उडिसा, बिहार आणि पंजाबमध्ये रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. तर महाराष्ट्रासह राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशसह इतर अनेक राज्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यस्थानमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले असून तेथे गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. रांचीमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली असून पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात या कायद्याअंतर्गत तत्काळ अटकेचे प्रावधान शिथिल करत अटकपुर्व जामिनाचे देखील तरदूद केली आहे. सोबतच या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याअगोदर पोलीस उपअधिक्षकांनी प्राथमिक चौकशी करण्यास व सरकारी अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याअगोदर त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याची परवानगी घेण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्रात मुंबईतल्या वांद्रेत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. नागपुरात इंदोरा मैदानाजवळ जमावाकडून एका बसवर दगडफेक करण्यात आली. तसेच, ती बस जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. नांदेडमध्येही रेलरोको करुन आंदोलन झाले. आंदोलक विद्यार्थ्यांनी तपोवन एक्स्प्रेस थांबवण्याचा प्रयत्न केला.