Breaking News

इराकमधील 38 जणांचे मृतदेह भारतात दाखल


अमृतसर - इराकमधील मोसूलमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या 38 भारतीयांचे मृतदेह मायदेशी परत आणण्यात आले आहे. सोमवारी दुपारी हवाई दलाचे विशेष विमान अमृतसर विमानतळावर दाखल झाले. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे यावेळी विमानासोबत होते. अमृतसर विमानतळावर पंजाबचे सांस्कृतिक कार्य मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आणि संबंधित राज्याचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी काही मृतांच्या नातेवाईकांना अधिकार्‍यांनी शवपेट्या उघडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक नातेवाईकांनी त्याला नकार दर्शविला असून पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करणार असल्याचे म्हटले आहे. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी संबंधित नातेवाईकांचे डीएनए सँपल गोळा करण्यात आले होते. त्यानंतर बगदाद येथे 39 मृतदेहांची तपासणी करण्यात आली. डीएनए जुळल्यानंतर मृतदेहांची ओळख पटली. 39 मृतांपैकी सर्वाधिक 27 जण पंजाबचे आहेत. त्याखालोखाल हिमाचलचे 4, बिहारचे 4, बंगालचे 1 नागरिकांचा समावेश आहेत. 2014 मध्ये मोसूलमधून या भारतीयांचे अपहरण झाले होते. दहशतवादी संघटना इसीसने या सर्व भारतीयांचे अपहरण त्यांना नंतर त्यांची हत्या केली. या भारतीयांना शोधण्यासाठी केंद्र सरकारने इराक सरकारची मदत मागितली होती.