Breaking News

खेड विद्यालयात इंधन बचत उपक्रम दक्षता, नियोजनाचे विद्यार्थ्यांना धडे


भारत सरकारच्या पेट्रोलियम व गॅस मंत्रालयामार्फत सध्या इंधन बचतीचा संदेश देण्याची मोहीम राबविली जात आहे. नियोजनाच्या अभावामुळे इंधन व गॅसचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यात ही मोहीम राबविली आहे. खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना इंधन बचतीची महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.
इंधन बचतीची माहिती असलेले फलक व इतर सुविधा असलेल्या व्हॅनचा वापर करुन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. व्हिडिओ चित्रीकरण दाखविण्याची सुविधा असलेल्या या व्हॅनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इंधन बचतीचे धडे घेतले. प्राचार्य चंद्रकांत मोरे यांच्या उपस्थितीत दिपक चौधरी, अमोल जैन यांनी विद्यार्थ्यांना चित्रीकरण दाखवले. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेत त्यांना माहिती देण्यात आली. वाहन सुस्थितीतील ठेवण्याची माहिती, वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता, स्वयंपाक करताना करावे लागणारे नियोजन व गॅसचा योग्य वापर आदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पेट्रोलपंप, शाळा, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी हे कार्यक्रम घेतले जात असल्याची माहिती दिपककुमार चौधरी यांनी दिली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब मोरे, मारुती सायकर, चंद्रकांत चेडे, हासन सय्यद, रूपचंद गोळे, काशीनाथ सोनवणे, बाळासाहेब काळे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.