Breaking News

अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गामूळे बाजारपेठ उध्वस्त?


अहमदनगर-अहमदपुर हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झालेला असून, सदर रोड हा जामखेड शहरातून जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेची दुकाने व गोरगरिबांच्या व्यवसायांवर हातोडा पडणार आहे. तसेच बाजार पेठेचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा रोड शहराच्या बाहेरून बायपास काढून नेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी यांनी केली आहे. त्यासाठी आपण जनअंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.


त्यासंदर्भात प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महाहामंडळाने नगरपरिषदेस यासंदर्भात पत्र दिले आहे. सदर रोड संदर्भात टेंडर प्रक्रिया पुढील महिन्यात सुरु होणार आहे. हा चौपदरी मार्ग जामखेड शहरातून जाणार आहे. हा रस्ता चौपदरी असल्यामुळे नगर-बीड रोडवरील रोडच्या मध्यापासून दोन्ही बाजुची सुमारे ऐंशी फूट बांधकामे काढण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणांबरोबरच खाजगी मालकीच्या दुकानांवरही हातोडा पडणार आहे. त्यामुळे नगर रोडवरील जामखेड शहर हद्दीपासून साकत फाट्यापर्यंत या रोडवरील शकडो दुकानदार रस्त्यावर येऊन बेरोजगारी वाढणार आहे. यामुळे जामखेड शहरातील व्यापारच संपुष्टात येईल अशी चिंता कोठारी यांनी व्यक्त केली आहे. जामखेड शहराची बाजारपेठ ही विकसित होण्यासाठी खूप वर्षे लागलेली आहेत. या बाजारपेठेमुळेच जामखेडची सर्वत्र ओळख आहे. गेल्या पाच-सात वर्षापासून जामखेडचे 70 टक्के मार्केट हे नगर-बीड रोडवर केंद्रित झालेले आहे. असे असतांना सदर प्रास्तावित रोड जामखेड शहरातून गेल्यास या रोडवरील मोठ्या प्रमाणात दुकाने उठवली जातील. त्यामुळे शकडो व्यवसाय बंद पडतील व हजारो लोक बेरोजगार होतील. 
त्यामुळे सदर प्रस्तावित अहमदनगर-अहमदपुर रोडसाठी जामखेड शहराच्या बाहेरून बायपास काढण्यात यावा अशी मागणी राजेंद्र कोठारी यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच आपण शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, प्रमुख नागरिक व पत्रकारांची मिटींग आयोजित करणार असून जामखेड शहर बायपास कृती समितीची स्थापना करण्यात येईल. तसेच पुढील अंदोलनाची रुपरेषा ठरवली जाईल अशी माहिती कोठारी यांनी दिली. तरी शहरातील सूज्ञ नागरिक, व्यापारी सर्व टपरीधारकांनी बायपास या विषयावर एकत्र येण्याचे आवाहन राजेंद्र कोठारी यांनी केले आहे.