Breaking News

युवकांनो देशाला विश्‍वगुरू बनवा- राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत


नागपूर, दि. 25, मार्च - देशाला विश्‍वगुरु बनविण्याचे माजी राष्ट्र्पती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता युवाशक्तीमध्ये आहे. आयुष्यात मोठे होण्यासाठी महापुरुषांचे आदर्श ठेवा, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपालबनवारीलाल पुरोहित यांनी केले. नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या 105व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष कुलगुरु डॉ. सिध्दार्थविनायक काणे, प्र-कुलगुरु प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. पुरणचंद मेश्राम यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी पुरोहित म्हणाले की, ते 1959 साली याच विद्यापिठातून पदवीधर झाले असल्याचे सांगून पुढे म्हणाले की, आज ते तामिळनाडूतील 22 विद्यापिठांचे कुलपती आहेत. याचे सर्व श्रेय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाला जाते. विद्यापिठातून पदवी प्राप्त केल्यानंतर प्रत्यक्ष जिवनात येणार्‍या आव्हानांचा सामना करण्यासाठी शिक्षणच मदत करणार असल्याचा वडीलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी युवकांना दिला. आयुष्यात सतत वाचन करा. वाचनसंस्कृती जोपासा. त्यातून तुमच्या ज्ञानात भर पडेल, असे सांगून, त्यांनी रा्ष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वृत्तपत्रीय लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुष्यात तत्त्वनिष्ठता, कर्म, चारित्र्यसंपन्नता, नैतिकता, आणि मानवीय दृष्टिकोन, ध्येयाप्रती निष्ठा या बाबींचे आयुष्यातील महत्त्व अधोरेखित केले.

वेळेचे महत्त्व ओळखून, योग्य नियोजन करा, शिक्षणासोबत वाचनसंस्कृती जोपासा, चारित्र्यसंपन्नता अंगिकारा तसेच गुरुला कायम आदर्शवत माना. पुस्तके ही ज्ञानाची भांडारे असून त्यातून माणसांची जडणघडण होते. त्या जडणघडणीतून साधी राहणी व उच्च विचारसरणी आत्मसात करता येते. या गोष्टी तंतोतंत पाळणारे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम देशाला मिळाले. त्यांचा आदर्श घ्या. त्यांच्या आदर्शातूनच देशाला विश्‍वगुरु बनविण्याची युवाशक्तीमध्ये क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापेक्षा मोठा आदर्श कोणता असून शकतो. त्यांचे अग्निपंख हे आत्मचरित्र वाचा, विद्यापिठाने हे पुस्तक उपलब्ध करुन दिले पाहिजे, असे सांगून कामाप्रती सातत्य, निष्ठा आणि सेवाभाव तसेच प्रामाणिकपणाने काम करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
विद्यापीठाच्या 105 व्या दीक्षांत समारंभात 2017 च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 48 हजार 391 विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच विविध परीक्षांमधील 172 प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना 312 सुवर्ण पदके, 43 रौप्य पदके, 102 पारितोषिके अशी एकूण 457 पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आलीत.