Breaking News

कुडाळमध्ये दिव्यांग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद


सिंधुदुर्गनगरी, कुडाळ पंचायत समितीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय दिव्यांग मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, दोन तासांपेक्षा जास्त वेळ त्यांना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत बसावे लागले. गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी उद्घाटनप्रसंगी मेळाव्याच्या शुभारंभास थोडा उशीर झाला. परंतु सकाळी 9.30 पासून नोंदणी सुरू होती. आता तपासणी सुरू होईल. दुपारच्या जेवणाची सोय आहे. दिव्यांग व त्यांच्या पालकांना घरी जाण्याची गैरसोय असेल, तर वाहनाचीही व्यवस्था करू, असे सांगून दिव्यांगांची हेळसांड होणार नाही, अशी ग्वाही दिली आणि उद्घाटनाला उशीर झाला, म्हणून तक्रारीचा सूर लावणा-या दिव्यांगांच्या पालकांनी त्याला टाळयांनी प्रतिसाद दिला.

पं. स.च्या स्वउत्पन्नातून दिव्यांग व्यक्तींचे स्थान, मनातील न्यूनगंड तसेच त्यांच्या उन्नतीसाठी मार्गदर्शन व चर्चा या उद्देशाने कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात पं. स. ने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी सकाळी नऊ वाजण्याची वेळ देण्यात आली होती. दिव्यांग व त्यांचे पालक त्यावेळेपासून मेळाव्याच्या ठिकाणी येत होते. सकाळी 9.30 पासून दिव्यांग उपस्थितीची नोंदणी सुरू झाली. मेळाव्याच्या ठिकाणी दिव्यांग लाभार्थींची तपासणी करण्यासाठी तपासणी कक्ष उभारण्यात आले होते. असे असताना मेळाव्याचा शुभारंभ झाल्याशिवाय तपासणी सुरू झाली नाही. त्यातच शुभारंभासाठी दोन तास उशीर झाला. त्यामुळे नाराजी होती. शुभारंभापर्यंत आरोग्य विभागाचे प्रकाश तेंडोलकर यांनी दिव्यांगांच्या कर्तृत्वाची उदाहरणांसह माहिती देत व्यासपीठ चांगलेच सांभाळले होते. पावणेबारा वाजता सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जि. प. सदस्या वर्षा कुडाळकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पं. स. सदस्या मथुरा राऊळ, प्राजक्ता प्रभू, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा शुभारंभ झाला.

दिव्यांगांच्या उन्नतीसाठी हा मेळावा पं. स. च्या माध्यमातून आयोजित केला होता. मेळाव्यात रोजगारा संबंधित मार्गदर्शन होणार आहे. त्याचा फायदा आपण घ्यावा तसेच शासनाच्या विविध योजना आहेत, त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन सभापती जाधव यांनी केले. उपस्थितीबाबत समाधान व्यक्त केले, तर दिव्यांगांसाठी आपल्या स्तरावरून जी मदत होईल, ती देण्याचे आश्‍वासन उपसभापती परब यांनी देऊन आपणही आपल्याला झालेल्या अपघातानंतर दिव्यांग आहे. दिव्यांग म्हणजे काय हे मी अनुभवले आहे, असे त्यांनी सांगितले. मेळाव्यात देण्यात येणारी माहिती उपयुक्त ठरणार आहे. ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र नाही, त्यांच्यासाठी पं. स. च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे विजय चव्हाण यांनी जाहीर केले.

दिव्यांगावर मात करून आज सन्मानाने जीवन जगत असलेले शामसुंदर लोट (भडगाव), विजय कदम (कुंदे), गुरुनाथ सामंत (मांडकुली), सुरेखा सरवणकर (गोवेरी) व लवू परब (बांबुळी) यांचा सत्कार करण्यात आला. दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. दिव्यांगांनी कलागुणही सादर केले. सूत्रसंचालन तेंडोलकर, तर आभार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आनंद कुंभार यांनी मानले.