Breaking News

शेवगाव तालुक्यातील चौथ्या टप्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर

शेवगाव तालुक्यातील चौथ्या टप्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले. शेवगाव तालुक्यातील मतदारांनी संमिश्र कौल देत भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना जिवंत ठेवले आहे. या निकालावरून भविष्यातील विधानसभा व लोकसभा कोणाच्याही एकाची नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी कौल देताना पक्षाला कौल तर दिलेलाच आहे, परंतु गाव पातळीवरील विकासाला प्राधान्य दिलेले दिसते. चौथ्या टप्यात पार पडलेल्या निवडणुकीत वडुले बु तालुका शेवगाव या ग्रामपंचायतीत भाजपचे बाळासाहेब सोपान आव्हाड यांनी सरपंच पदासाठी विष्णू आव्हाड यांच्यावर मात केली आहे. येथे ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव आंधळे यांच्या पॅनलचा दारूण पराभव केला आहे.
एरंडगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे संतोष विठ्ठल धस यांनी दिलीप अण्णासाहेब धस यांचा 28 मतांनी सरपंच पदासाठी पराभव केला. देवटाकळी येथे राष्ट्रवादीच्या दोन गटात झालेल्या सरळ सरळ लढतीत अनिता ज्ञानदेव खरड या विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या रेखा देवेंद्र मेरड यांचा पराभव केला. येथे भाजपचे मुस्साभाई शेख यांना खाते खोलता आले नाही.

त्यानंतर तालुक्यातील मडके, कोळगाव, शेकटे, रांजणी, राक्षी येथे झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये रांजणी वार्ड क्र.1 मध्ये मंगल गोविंद वाघ (राष्ट्रवादी) या विजयी झाल्या. राक्षी पोटनिवडणूकीमध्ये वार्ड क्र.1 मध्ये धनंजय कातकडे विजयी झाले. मडके पोटनिवडणूक वार्ड क्र.1 मध्ये द्वारकाबाई महादेव वडघणे या विजयी झाल्या. तसेच कोळगाव पोटनिवडणूक वार्ड क्र.3 मध्ये मनीषा अरुण खंडागळे या विजयी झाल्या आहेत. शेकटे पोटनिवडणूक वार्ड क्र.3 मध्ये बोरुडे आशा गणेश या बिनविरोध निवडून आल्या.
अशा पद्धतीने शेवगाव तालुक्यातील चौथ्या टप्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये मतदारांनी संमिश्र कौल देत विकासाला प्राधान्य दिले आहे. येथे पक्षाला कोठेही स्थान दिलेले आढळत नाही.