Breaking News

खर्ड्याची कानिफनाथ यात्रा शांततेत पार पाडावी ः संजय गोपाळघरे


जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा गावची कानिफनाथ यात्रा होळी शुद्ध पौर्णिमेला होत असून या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक हजेरी लावून कानिफनाथांचे मनोभावे दर्शन घेतात. तरी सर्व भाविक भक्तांनी कानिफनाथ यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन खर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच संजय गोपाळघरे यांनी केले आहे.खर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत मंदिरावर व यात्रेच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच आरोग्यपथक, सावलीची व्यवस्था व पाळण्याजवळ वाद निर्माण होवू नये म्हणून यात्रेपासून पाचशे मीटर अंतरावर पाळणे बसविण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जामखेड व खर्डा येथील पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यावर्षापासुन मानाच्या काठ्यांचा कालावधी वाढवून 3 ते 6 वाजेपर्यंत या काठ्या वाजत गाजत शिखरावर पाडण्यात येणार आहेत. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. हिंदू - मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानकडे पाहिले जाते. खर्डा ते कानिफनाथ यात्रा अंतर 2 किलोमीटर असल्याने जामखेड आगारामार्फत जादा बस गाड्यांची सुविधा पुरविली जाते. सायंकाळी कानिफनाथांचा संदल निघतो. पहाटे चार वाजता शोभेची दारु उडवून आतषबाजी केली जाते. दोन दिवस चालणारी ही यात्रा प्रसिद्ध असून यात्रोत्सव काळात सर्वांनी शांततेत व यात्रेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन सरपंच संजय गोपाळघरे यांनी केले आहे.