Breaking News

फसवणूकप्रकरणी मध्य प्रदेशातील दोन व्यापा-यांविरोधात गुन्हा

सोलापूर, दि. 14, मार्च - मार्केट यार्डातील व्यापा-याकडून तुरी घेऊन 10 लाख 2 हजार 510 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील दोन व्यापा-यांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरनाथ मल्लिनाथ कटप (वय 32, रा. मरिआई चौक, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून अवतार एजन्सीचे मालक, दलाल राजेश मेठाराम बसंतानी आ णि वाडवीणी इंडस्ट्रीजचे मालक कंवरलाल धरमदास वासवानी (रा. माधवनगर, कटणी, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरनाथ कटप यांचे सोलापूर मार्केट यार्डामध्ये अक्षय ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. या दुकानातून 6 फेब्रुवारी रोजी अवतार एजन्सीचे मालक, दलाल राजेश मेठाराम बसंतानी यांच्यामार्फतीने एमपी 22 एच 4112 या वाहनातून तुरीच्या 21 टन 330 किलोग्रॅम वजनाच्या 325 पिशव्या वाडवीणी इंडस्ट्रीजचे मालक कंवरलाल धरमदास वासवानी यांच्याकडे पाठवून दिल्या होत्या. या तुरीचे 10 लाख 2 हजार 510 रुपये हे बसंतानी व वासवानी या दोघांना वारंवार मागणी करण्यात येत होते. परंतु त्या दोघांनीही तुरीचे पैसे देण्यास टाळाटाळ करून ही रक्कम न देता फसवणूक केली म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राठोड तपास करीत आहेत.