Breaking News

आरोग्य निरीक्षकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे, दि. 14, मार्च - नूतनीकरण आणि हॉस्पिटलच्या नोंदणीसाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना वैद्यकीय अधिकार्‍यासह एका आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्र तिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज (मंगळवारी) दुपारी दीड वाजता आरोग्य विभाग, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय येथे करण्यात आली. 

मधुकर निवृत्ती पाटील (वय- 53,आरोग्य निरीक्षक) आणि संदीप जयराम धेंडे (वय - 40, वैद्यकीय अधिकारी) अशी लाचखोर कर्मचा-यांची नावे आहेत. यातील फिर्यादी डॉक्टर असून त्यांचे स्वत:चे रुग्णालय आहे. या रुग्णालयाचा नोंदणी परवाना नूतनीकरणासाठी पुणे महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी त्यांनी अर्ज केला होता. हे प्रकरण ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक मधुकर पाटील आणि धेंडे यांच्याकडे होते. त्यांनी यासाठी फिर्यादीकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याची माहिती फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांना दिली.त्यानुसार एसीबीच्या अधिका-यांनी ढोले पाटील रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप धेंडे यांच्या सांगण्यावरून आरोग्य निरीक्षक मधुकर पाटील यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. दोघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.