Breaking News

अग्रलेख - काश्मीरमध्ये विकासाचे भान येण्याची गरज...


काश्मीरमध्ये सातत्याने सुरू असलेला हिंसाचार हा टोकाचा असून मुलतत्ववाद्यांनी आपल्या सोयीच्या राजकारणांसाठी तिथल्या युवकांचा वापर करून अशांतता पसरविण्यास सुरू वात केली आहे. वास्तविक धर्मांध विचार जोपासत सतत फुटीरवाद्यांच्या कळपात स्थानिक तरूणांनी सहभागी होणे, नक्कींच धक्कादायक आहे. अजूनही काश्मीरमधल्या युवकांमध्ये नव्या विचारांचे भान आलेले दिसत नाही. काश्मीरमधल्या युवकांनीच आता पुढाकार घेऊन फुटीरवाद्यांना आणि त्याला प्रोत्साहन देणार्‍यांना लष्करांच्या तावडीत देऊन काश्मीरच्या विकासामध्ये मोठी भूमिका बजवावी लागणार आहे. जगातील कोणत्याही राजकीय शक्तीला आजच्या घडीला धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर विचारांशिवाय पुढे जाता येत नाही. वास्त विक धर्म हा माणसासाठी आवश्यक असतो तो केवळ सामाजिक धारणेसाठी. प्रत्येक धर्मात शरीर आणि मन यांना एकत्रित आणण्यासाठी अध्यात्माचा एक मार्ग सांगितलेला असतो. त्यामुळे जगातील कोणत्याही धर्मात उपासना आणि प्रार्थना या दोन गोष्टी समान आहेत. जर मानव हा उपासना आणि प्रार्थना करुन स्वत:साठी आणि इतरांसाठी शांतता आणि सद्भावना निर्माण करुन जगण्याचा मार्ग प्रशस्त करत असेल तर तो त्या व्यक्ती धर्माचा आपल्यासाठी लावलेला अर्थ अतिशय योग्य म्हटला जाईल. धर्माला व्यक्ती आणि समाज यांच्या शांतताप्रिय सह अस्तित्वासाठी मानले गेले तर कोणत्याही धर्मामध्ये आपसांत संघर्ष होणार नाही. परंतु मानव समाजासाठी अशा प्रकारची शांतता जर नांदली तर ज्यांच्याकडे अधिकची गुणवत्ता नाही त्यांना त्या-त्या देशांच्या मध्यवर्ती सत्ता केंद्रांवर येताच येणार नाही म्हणून त्या-त्या धर्मातील कडवे किंवा धर्मांध प्रवृत्ती आक्रमक होतांना दिसतात. या प्रवृत्ती जगातल्या बहुतांश धर्मात दिसून येतात. यांची संख्या अत्यंत नगण्य असुनही अशांतता आणि दहशतवाद हा यांचा आधार असतो. भारतातही जी धर्मांध व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे सातत्याने केला जात आहे त्याचाही विचार करावा लागेल. त्यांच्यामध्ये वैयक्तीक विचारांमध्येही बदल घडवावा लागेल. सध्या जग आ र्थिक विकासाच्या दिशेना मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे जगातील सर्वच देशांचे राज्यकर्ते आर्थिक गुंतवणूक आणि व्यापाराचा व्यवहार यावरच आपले लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे धर्मांध विचारांचा प्रभाव हा दिवसेंदिवस संकुचित होत जाणार असुन त्याला नव्या पिढीच्या विचारांमध्ये स्थान मिळणार नाही. कारण नवी पिढी ही वैज्ञानिक विचार करणारी असल्यामुळे या पिढीला धर्मभावना भडकावून रस्त्यावर उतरविता येणार नाही याची जाण देशातील प्रतिगामी शक्तीला आता येवू लागली आहे. धर्मांधपणे रस्त्यावर जो जमाव उतरविला जातो तो साधारणपणे शूद्र किंवा ओबीसी म्हणजेच बहुजन समाजातील तरुणांचा असतो. या तरुणांनाही आपल्या विकासाचे आता भान आले असुन त्यासाठी वैज्ञानिक विचार आणि शैक्षणिक आधार या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. या व्यतिरिक्त आपण इतस्तत: भटकू नये यावर आता तो गंभीरपणे विचार करु लागला आहे.