Breaking News

जलयुक्त योजना फोल ! खडसेंचा सरकारला घरचा आहेर


मुंबई : जलयुक्त योजनेतील कामे ही सध्या फोल ठरत असल्याचा आरोप शुक्रवारी भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. त्यांच्या या टीकेमुळे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या टीकेचा रोख होता. विरोधी पक्षात असताना ज्या गोष्टीसाठी आंदोलने केली, सभागृह बंद पाडले त्या मागण्या तरी राज्य सरकारने मान्य केल्या पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी सरकारकडे केली आहे. अल्पसंख्याकांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. पहिल्या वर्षी जलयुक्तची कामे चांगल्या प्रमाणात झाली आहेत. मात्र त्यानंतर जलयुक्तच्या कामात काहीही झाले नाही. जलयुक्तच्या कामासाठी निधीच दिला जात नाही. अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असल्यामुळे ही चांगली योजना फोल ठरत आहे. यावर्षी राज्यातील जलयुक्तची कामे बंद पडलेल्या स्थितीत आहेत. पहिल्या वर्षी झालेल्या कामाच्या तुलनेत 25 टक्के जलयुक्तची कामे झाली नसल्याचा दावा खडसे यांनी सभागृहात केला. एका चांगल्या योजनेचा बोजबारा उडविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
अल्पसंख्याक, जलसंधारण, पर्यटन या विषयाशी संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदींवर आज विधानसभेत चर्चा पार पडली. यावेळी बोलताना भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात काम करत आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने अल्पसंख्याकांसाठी मंजूर केलेल्या तंत्रनिकेतनला निधीच उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे सरकारची भूमिका काय, आहे स्पष्ट होत असल्याचा आरोप खडसे यांनी विधानसभेत केला. अल्पसंख्याक तसेच मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्‍न गंभीर आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीयांसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर वसतीगृह उभारण्याची गरज असून सरकारने मुला-मुलींसाठी वसतीगृह उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली.