Breaking News

मिरजगांवकरांची रस्त्याची साडेसाती काही संपेना धुळीतून काढले आणि धडधडीत टाकले


नगर-सोलापूर महामार्गाची दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील प्रवास जीवघेणा बनला असून वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेवून वाहने चालवावी लागत आहेत. महामार्गावरील खड्डयांमुळे व धुळीच्या साम्राज्यामुळे महामार्ग परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पावसाळा संपल्यानंतरही महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली नव्हती. त्यानंतर अनेक निवेदने देवून ग्रामस्थ रस्त्यावर आल्यानंतर साडेसातीच्या फेर्‍यात अडकलेल्या नगर-सोलापूर महार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास अखेर मुहूर्त मिळाला. परंतू या कामास अत्यंत संथ गतीने सुरुवात झाली. त्यामुळेे महामार्गावरील वाहतूकीची कोंडीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात दिसून आला. 1 कि.मी.साठी 25 लाखांचा निधी मंजूर केला, असताना मिरजगांव येथील नदीच्या पुलापासून रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंतचे काम खाजगी ठेकेदाराकडून करण्यात आले. या कालावधीत सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे अधिकारी आठवण येईल तेंव्हा साईटवर येत असत. ठेकदाराबरोबर गुप्तगू करून निघून जात. ठेकेदार व संबंधीत अधिकारी यांना रस्त्याच्या कामाबद्दल स्थानिकांनी विचारणा केली असता, पहिले खड्डे बुजून खडीकरणचा थर व यावरून कारपेट थर देणार असल्याचे सांगत. परंतू याभागातील जनतेला खड्डे व धुळीतून बाहेर काढले परंतू खडीकरणाच्या धडधडीत टाकले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे पाठीचे व मनक्याच्या आजार वाढले तर दुचाकी व चारचाकी वाहनांचा खुळखूळा होण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशिर्वादाने झाली आहे.
नगर-सोलापूर महामार्गाची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे. या रस्त्यावर कारपेट थर कधी टाकणार की हे काम असेच अर्धवट राहणार आहे. याकडे मिरजगांव ग्रामस्थाचे लक्ष लागले असून झालेल्या कामातच 25 लाखांचा निधी संपला हा चर्चेचा विषय बनला आहे.
मिरजगाव परिसरातील महामार्गावरील खड्ड्यात भरलेल्या मुरुमाची अवजड वाहनामुळे माती होवून या रस्त्यांवरून वाहने गेल्यानंतर धुळीचे लोटच्या लोट उडताना दिसत होते. हीच धूळ परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत असताना महामार्गाच्या कडेला असणार्‍या नागरिकांना धुळीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच महामार्गाशेजारी असणार्‍या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
नगर-सोलापूर महामार्ग दुरुस्त करण्यात यावा म्हणून आजपर्यंत अनेक वेळा अंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी फक्त अश्‍वासने देण्यात आली. यामुळे मात्र कित्येक अपघात घडले, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. नगर-सोलापूर महामार्ग अशोका बिल्डकॉन या खाजगी कंपनीकडे होता. 2014 साली या रस्त्याचा करार संपल्यानंतर या महामार्गाची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते. साईडपट्ट्या पूर्णपणे गायब झालेल्या आहेत. रस्त्याच्या बाजूला एक ते दीड फुटाचे खड्डे पडलेले होते. या साईडपट्टया भरण्याचे काम गेल्या 3-4 वर्षांत झालेले नव्हते. आज रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. 2014 पूर्वी वाहनांना पथकर देवून प्रवास करावा लागत होेता. मात्र त्यावेळी नगर मिरजगाव हा रस्ता सुस्थितीत होता. त्यावेळी पथकर देवून का होईना वाहतूक सुरळीत होत होती.
त्यामुळे वाहन चालकांना पथकर दिल्याचे कोणतेही दुखः होत नव्हते. आता मात्र नगर मिरजगाव रस्त्याच्या 50 किलोमीटर अंतराला दोन तास ते अडीच तास वेळ जात आहे. यामुळे अनेक अत्यावस्थ रुग्णांचे रस्त्यातच निधन झालेले आहे. हा अनेकांचा अनुभव आहे. आज रोजी नगर-सोलापूर महामार्ग केवळ मृत्यूचा सापळा बनला आहे.