Breaking News

विरोधी पक्षनेत्यांच्या ओएसडीला धमकी सभागृहात गदारोळ, अधिकारी निलंबित

मुंबई - राज्यात मोकाटपणे विकण्यात येणार्‍या गुटख्याची लक्षवेधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केली. त्यातून चौकशी लावली म्हणून एफडीएच्या अधिकार्‍याने भाजपच्या आमदारासोबत येऊन मुंडे यांच्या ओएसडीला त्यांच्या कार्यालयात येऊन धमकी दिली. या धमकीचे तीव्र पडसाद सभागृहात उमटल्याने कामकाज 2 वेळा तहकूब करावे लागले. त्यावरुन धमकी देणार्‍या अन्न आणि सुरक्षा अधिकारी आर.डी. आकरूपे यांना निलंबीत केले आहे.

सभागृहात प्रश्‍न उपस्थित करण्याचा विरोधीपक्ष नेत्याला आणि सदस्यालाही अधिकार आहेत. त्यात विरोधी पक्षनेत्याचे स्थान वेगळे आणि महत्वाचे आहे. अशा प्रकारे अधिकारी येऊन धमकी देत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे सांगत बापट यांनी या अधिकार्‍याचे निलंबन करून त्याची सविस्तर चौकशी केली जाईल अशी ग्वाही दिली.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 4 दिवसांपूर्वीच राज्यात होणार्‍या गुटखा विक्री आणि त्याच्या उत्पादनाविषयी लक्षवेधी उपस्थित केली. यात 1 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची बाब मांडली होती. त्यात भिवंडी आणि ठाणे विभागात हा प्रकार कसा होतो, याची माहिती सभागृहापुढे मांडली होती.