Breaking News

राळेगण सिद्धीमध्ये रास्ता रोको; घंटानाद आंदोलन तासभर वाहतूक ठप्प



जनलोकपाल आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 23 मार्च पासून दिल्ली येथिल रामलिला मैदानावर विविध मागण्यांसंदर्भात सत्याग्रह सुरु केला आहे. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राळेगण परिवाराने त्या दिवसापासुनच सुरुवात केली आहे. पद्मावती मंदीर परिससरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुरवात करण्यात आली. परिवाराच्या वतीने लाक्षणिक उपोषण, सरकारच्या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन आंदोलनास काल पाठींबा देण्यात आला. संध्याकाळी ग्रामस्थांच्यावतीने कँडल मार्चचे नियोजन करण्यात आले. या कँडलमार्चचे संत यादव बाबा मंदीराजवळ आल्यानंतर ग्रामसभेत रुपांतर करण्यात आले. आजच्या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात आली. त्यानुसार शनिवारी उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी 11 वाजता पारनेर शिरूर मार्गावर राळेगणसिध्दी येथे सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये युवक, युवती, शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ यांचा प्रचंड मोठा सहभाग होता. या दरम्यान अण्णांची गावकर्‍यांशी फोनद्वारे चर्चा झाली. हजारे यांनी दिल्ली येथिल आंदोलनाबाबत माहिती दिली. तुम्ही काही काळजी करू नका, गावात तसेच तालुका पातळीवर आंदोलन, उपोषण व धरणे आंदोलन सुरू ठेवावे असे हजारे यांनी सांगितले. यावर आपण तब्बेतीची काळजी घ्यावी असे गावकर्‍यांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी अण्णांच्या आंदोलनाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने सकारात्मक विचार करुन मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशा प्रकारचे निवेदन पारनेरचे नायब तहसिलदार दत्तात्रय बाहुले यांना देण्यात आले. त्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. त्यानंतर सर्व आंदोलक यादव बाबा मंदीरात आल्यानंतर घंटानाद आंदोलन सुरूच ठेवले.