'आळंबी' उत्पादनातून स्वयंरोजगाराचा नवा मार्ग!
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणा-या संगमनेर महाविद्यालयात सातत्याने विद्यार्थीपूरक विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून वनस्पतीशास्त्र विभागातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील ज्योती कडलग, अंजली देशमुख, प्रतिक्षा पवार, सीताराम मुठे या एम. एस्सीच्या विद्यार्थ्यांनी आळंबी उत्पादन करुन स्वयंरोजगाराचा नवीन मार्ग अवलंबविला आहे.
या विद्यार्थ्यांनी आळंबी उत्पादन ही आगळी वेगळी संकल्पना राबविली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळया कौशल्याचा विकास व्हावा व त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणुन वनस्पतिशास्त्र विभागाने वृक्ष दत्तक योजना, बोनसाय कार्यशाळा आदी अभिनव उपक्रम यावर्षी यशस्वीरित्या राबविले आहेत. हे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आळंबीचे उत्पादन घेत असून त्याची घरोघरी जाऊन विक्री करत आहेत. त्यातूनच त्यांना अर्थार्जन प्राप्त होत आहे. त्याचबरोबर हे विद्यार्थी नागरिकांना आळंबी खाण्याचे फायदे पटवून देत आहेत.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख म्हणाले की, संगमनेर महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम आयोजित करत असते. वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्य विकास, व्यावसायिकता व अर्थार्जन करुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी जीवनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. महाविद्यालयातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना आर्थिक मदत करणे व त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळया सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी व व्यवस्थापनातील सर्व सदस्य कटिबध्द आहेत.
दरम्यान, या यशस्वी उत्पादनाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. संगीता जाधव, प्रा. महेश नवले, डॉ. ख्याडे एम. एस., प्रा. तांबे ए. एन., प्रा. पडवळ ए. डी., प्रा. हासे व्ही. बी., प्रा. जाधव आर. डी., संतोष सातपुते आदींचे मार्गदर्शन लाभले.