Breaking News

विशेष लेख - शेतकर्‍यांना बाजारपेठेशी जोडणारा महोत्सव

नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो तो सर्वप्रथम शेतकर्‍यांना. पिकावर वातावरणातील बदलांचे दूरगामी परिणाम होतात. कधी कधी पीक भरघोस आले तरी अचानक भाव पडल्याने नुकसान होते. शेतीत नवनवे तंत्रज्ञान विकसीत होत असताना अनेक शेतकर्‍यांपर्यंत हे संशोधन पोहोचत नाही. शहरी भागात येऊन आपल्या उत्पादनांची विक्री करणे शेतकर्‍यांना शक्य होत नाही. मागणी असूनही अनेकवेळा शेतकर्‍यांचा उत्तम दर्जाचा माल योग्य त्या ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मर्यादा येतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यभर जिल्हास्तरीय कृषि महोत्सवांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या महोत्सावामुळे शेतकर्‍याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास मदत झाली आहे. ‘वाटचाल प्रगतीची, शेतकर्‍यांच्या उन्नतीची’ हे ब्रीद घेऊन आयोजित केलेला हा उपक्रम शेतकर्‍यांना तंत्रज्ञान आणि बाजारपेठेशी जोडणारा सेतू बनला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सोलापुरातील होम मैदानावर 11 ते 15 मार्च 2018 या कालावधीत कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला होता. अशा प्रकारचा महोत्सव प्रथमच सोलापुरात भरवण्यात आला. तब्बल एक लाख शेतकरी व सामान्य नागरिकांनी महोत्सवास भेट दिली. येथे लावलेल्या विविध स्टॉल्समध्ये सुमारे 35 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती कृषि महोत्सवाचे आयोजक व आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी दिली.
कृषि विषयक तंत्रज्ञान व शासकीय योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे, शेतकरी, शासन आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समूह/गट स्थापन करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साखळी विकसीत करणे, कृषिविषयक परिसंवाद आयोजित करून शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरेदीदार संमेलन आयोजित करून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास चालना देणे तसेच काढणी पश्‍चात तंत्रज्ञान व कृषि उद्योगास चालना देणे हा उद्देश समोर ठेऊन हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. विविध शासकीय आणि कृषि संशोधन केंद्र आणि विविध महामंडळांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यामुळे शेतकर्‍याने पीक लावण्यापूर्वीच्या काळापासून कापणी झाल्यानंतर त्याचा पुरवठा कुठे व कशा प्रकारे करावा याबाबत सर्व माहिती एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आली.
महोत्सवातील स्टॉल्समध्ये सेंद्रीय पद्धतीने तयार करण्यात आलेली उत्पादने प्रदर्शन व विक्रीस ठेवण्यात आले. या स्टॉलवरून थेट शेतकर्‍यांकडून वस्तू खरेदी करण्यास मिळत असल्यामुळे नागरिकांनी यथेच्छ खरेदी या ठिकाणी केली. ज्वारीचा केक, डाळिंबाचे बिस्किट, कडकनाथ कोंबडी, सेंद्रीय पद्धतीचे धान्य, फळे व भाजीपाला यांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व पसंती मिळाली. त्यामुळे सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न शेतकर्‍यांच्या लक्षात आले आहे. दर्जा उत्तम असेल तर ग्राहक पैसे देण्यास तयार होतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला त्याने दिलेल्या पैशाचा योग्य मोबदला आपल्या उत्पादनातून देता येईल. त्याने उत्पन्न तर वाढेलच, मात्र त्याचबरोबर एक उत्तम दर्जाच्या उत्पादनाची विक्री केल्याचा आनंद शेतकर्‍यांना होणार आहे.
रासायनिक शेतीमुळे होणारी हानी टाळून सेंद्रीय शेतीकडे शेतकर्‍यांना वळवण्यासाठी, शेतकर्‍याला आत्मविश्‍वास व प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यापर्यंत नवनवे तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी कृषि महोत्सव येत्या काळात महत्त्वाची भूमिका बजावतील, हे मात्र नक्की.


हर्षल आकुडे, 
संहिता लेखक