Breaking News

दखल - नागरिकांच्या भावनांशी खेळ

भारतीयांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्याची घटना जितकी वेदनादायी आहे, तितकीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक वेदनादायी घटना अपहृत नागरिकांची केलेली हत्या सरकारनं दडवून ठेवली, ही आहे. 39 भारतीयांचा मृत्यू दडव्ाून ठेवून त्यांना आशेला लावून ठेवणं ही बाब गंभीर आहे. सध्या माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. या युगात कोणतीही घटना फार काळ लपून राहू शकत नाही. उपग्रहांसह अन्य यंत्रणेमार्फत अशा घटना लगेच कळू शकतात. भारताच्या उपग्रहांनी अवघं अवकाश व्यापून राहिलं असताना अपह्त केलेले भारतीय कुठं आहेत, हे भारत सरकारला कळू नये, याचं आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. माग सीरियातून अपहृत नागरिकांची सुटका करण्याचा किती मोठा बडेजाव आपण केला. मग ही घटना कशी दुर्लक्षित राहिली? 


39 अपहृत नागरिकांची सुटका करण्यात अपयश येणं ही बाबही समजण्यासारखी आहे; परंतु अपहृत नागरिकांची हत्या होऊनही तीन वर्षे त्यांची माहिती मिळत नसेल, तर ते मात्र गंभीर आहे. ‘इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक’ (इसिस) या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत दुखःद आहे; पण सरकारनं ही माहिती देण्यास इतका उशीर का केला, असा जाब काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी विचारला. 39 नागरिकांचा मृत्यू झाला आहे हे माहीत असतानाही कुटुंबीयांच्या आशा विनाकारण पल्लवित ठेवण्याचा, त्यांच्या भावनेशी खेळण्याचा कुणालाच अधिकार नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत या घटनेची माहिती दिल्यानंतर थरूर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सरकारनं ही माहिती देण्यास इतका उशीर का केला, हे कसं घडलं, त्यांचा मृत्यू कसा झाला हेही सरकारनं सांगितलं पाहिजे, ही त्यांची मागणी चुकीची नाही. सरकारनं त्यांच्या कुटुंबीयांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा सरकारला अधिकार नाही, अशा शब्दांत थरूर यांनी फटकारलं. जून 2014 मध्ये इराकमधील मोसूल भागातून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं 40 भारतीयांचं अपहरण केलं होतं. या 40 जणांपैकी एकटा हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती; मात्र या 39 भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती. त्या वेळी परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीयांना इराकमधील कारागृहात बंद केलं असण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमधील 31 जण पंजाब, चौघे हिमाचल आणि बाकीचे बिहारमधील आहेत. चार वर्षांपूर्वी मोसुलमधून या भारतीयांचं अपहरण झालं होतं. या भारतीयांमध्ये मजुरांची संख्या जास्त होती. यामधील अनेकजण पंजाबमधील होते. ‘इसिस’नं 2014 मध्ये मोसुलचा ताबा घेतल्यानंतर या सर्व भारतीयांचं अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. भारतीय मोसुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच ‘इसिस’नं त्यांचं अपहरण केलं होतं. सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीप्रमाणं, सोमवारी त्यांना 38 भारतीयांचे डीएनए सॅम्पल जुळले असल्याची माहिती मिळाली. तसंच 39 व्या भारतीयांचा डीएनए 70 टक्के जुळला आहे. यासोबत सर्व भारतीयांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणले जातील, असंही त्यांनी सांगितलं आहे. जनरल व्ही. के. सिंह इराकला जाणार आहेत आणि सर्व भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणतील. इराकहून मृतदेह घेऊन उड्डाण करणारं विमान सर्वांत आधी अमृतसरला, त्यानंतर पाटणा आणि नंतर कोलकात्त्याला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. सुरुवातीला इराकमधून अपहरण झालेले भारतीय जिवंत असल्याचा दावा सरकारनं केला होता. स्वराज यांनी अपहृत भारतीयांच्या नातेवाइकांची भेटही घेतली होती. शोध घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असं आश्‍वासनही त्यांनी दिलं होतं. इराणी अधिकार्‍यांनी भारतीयांना एका रुग्णालयाच्या बांधकामासाठी नेलं होतं. नंतर त्यांना एका फार्ममध्ये काम करायला लावलं. यानंतर त्यांना कारागृहात बंद करण्यात आलं, अशी माहिती स्वराज यांनी दिली होती. दरम्यान, काँगे्रसनं केंद्र सरकारवर नागरिक कारागृहात आहेत, असं सांगत कुटुंब आणि देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.