Breaking News

सातार्‍यात पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनमध्ये प्लस्टिकची बकेट

सातारा, (प्रतिनिधी) : पंताचा गोट परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून अपुर्‍या दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे सभापती श्रीकांत आंबेकर यांनी तातडीने दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आंबेकर यांनी स्वतः उभे राहून पालिकेच्या कर्मचार्‍यांकडून काम करुन घेतले. त्यावेळी पाईपलाईनमध्ये प्लॅस्टिक ची बकेट आडकली असल्याचे पाहिल्यानंतर सर्वांना आर्श्‍चयाचा धक्का बसला. 
पंताचा गोट परिसरातील गिरवे ग्लास घर, माजी नगरसेवक जाधव यांच्या घराचा परिसर यासह नागरिकांना अपुर्‍या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी पाणी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे पाणी पुरवठा सभापती आंबेकर यांनी तातडीने सुचना दिल्या. दुरुस्तीसाठी पंताच्या गोटातील मारुती मंदिरासमोरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याची शक्यता गृहीत धरुन खोदाई केली. दुरुस्ती दरम्यान, आढळून आले प्लॅस्टिकचे बकेट. हे दुरुस्तीचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. 

दरम्यान, सातारा शहराच्या शाहुपूरी या उपनगरात गेल्या पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होणार्‍या भागात कमी दाबाने व र्दुगंधीयुक्त पाणी नळाला येत असल्याने काविळ सदृश्य साथ पसरली होती. पाणी पुरवठा करणार्‍या पाईमध्ये काहीतरी अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार खोदकाम करण्यात आले होते. त्यावेळी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या पाईपमध्ये मृत जनावर आढळून आले होते. ते जनावर नक्की माकड होते की, कुत्रे याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती. पाणी हे अत्यंत गरजेची बाब असताना पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमध्ये मृत जनावरे व प्लास्टिकच्या बकेट कोठून जातात. याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. बारकाईने पाहणी केल्यास पाणी पुरवठा करणार्‍या टाक्या ह्या उंच ठिकाणी असल्याने तेथे काही ठराविक लोकांची ये-जा असते. त्यामुळे या परिसरातील स्वच्छतेबाबत न बोललेले बरे. अशी स्थिती असल्याने पाण्याच्या टाक्या म्हणजे दारुडे, लफडेखोर, उनाड तसेच ओवाळून टाकलेल्या लोकांचे बसण्याचे अड्डे बनले आहेत. अशा लोकांवर नियंत्रण ठेवणे सरकारी कर्मचार्‍याच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये काहीही टाकले जात असल्याचे पहावयास मिळते. ह्या वस्तू क ालांतराने पाईपमधून बाहेर पडल्यानंतर ते पिण्याचे पाणी वितरण केले जात असलेल्या छोट्या पाईपमध्ये आडकून बसल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होतो.