Breaking News

जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी मंजूर


सोलापूर, दि. 19, मार्च - जिल्ह्यातील 210 अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. दुरुस्तीसाठी पहिल्यांदा निधी मिळाला असून त्या अंगणवाडींना आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेच्या महिला-बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख यांनी सांगितले. महिला-बालक ल्याण समितीची सभा सभापती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अंगणवाडी बांधण्यासाठी निधी मिळतो. पण, यापूर्वी बांधलेल्या अंगणवाडीची दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध नव्हता. त्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आमदार प्रशांत परिचारक, अध्यक्ष संजय शिंदे यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतल्याने निधी मिळाला, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक अंगणवाडीस एक लाख रुपयांचा निधी मिळणार असून त्याद्वारे दुरुस्ती करण्यात येईल. तसेच, परिसर सुशोभीकरण व इतर सोयी-सुविधा राबवून संबंधित अंगणवाडी आयएसओ करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात 53 बालके तीव्र कुपोषित आहेत. त्यांची तब्येत सुधारण्यासाठी आरोग्य जागृतीबाबत ठोस कृती धोरण राबविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. महिला समुपदेशन केंद्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात दाखल झालेल्या 18 तक्रारींपैकी सात निकाली काढल्या. तीन न्यायप्रविष्ट असून इतर तक्रारी प्रलंबित असून त्याचा आढावा घेतला.