Breaking News

‘एस. आर.’च्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा उत्साहात शुभारंभ


।संगमनेर / प्रतिनिधी। येथील एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि. या उद्योगसमुहामध्ये स्थापित झालेल्या १२४ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. वीज निर्मिती संकट विचारात घेता या उद्योगसमुहाने अपारंपरिक ऊर्जेच्या वापराबाबत मोठे पाऊल उचलले. यामुळे पर्यावरण संवर्धनासाठीही मोलाची मदत होणार आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे चमकदार सूर्यप्रकाशात दररोज सुमारे ५०० युनिट तर दरवर्षी १. ८ लाख युनिट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. याप्रसंगी एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि. चे चेअरमन आबासाहेब थोरात उपस्थित होते.

ते म्हणाले, की दूध उद्योगातील शीत प्रक्रियेसाठी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या सौर उर्जा निर्मितीमुळे या उदयोगास लागणाऱ्या एकूण ऊर्जेच्या १० ते १५ टक्के वीज या प्रकल्पातून निर्माण केली जाणर आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानप्रणाली वापरून उभारण्यात आला आहे. यासाठी एकूण २९० मॉड्यूल्स मेटल शीट रूफटॉपवर तर ७० मॉड्यूल आरसीसी छतावर बसवले आहेत. यामुळे अधिक प्रकाश शोषला जातो. मेटलशीट छप्परावर, सोलर पॉवर प्लांट उभारणे सोपे नसते. कारण उभारणी दरम्यान मजुरांची सुरक्षा एक प्रमुख चिंता असते. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यामुळे थेट सूर्याची किरणे छतावर न पडल्यामुळे खाली उष्म्याचे प्रमाण कमी होते. १०० किलोवॅट सौर ऊर्जा निर्मितीने कार्बन उत्सर्जनच्या प्रमाणात कमालीची घट होते. ग्लोबल वार्मिंगचे घातक परिणाम कमी करण्यासाठी अपारंपरिक उर्जेच्या वापरावर आपण सर्वानीच भर देणे आवश्यक आहे.