Breaking News

विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून कायद्याचे ज्ञान दिले जावे - न्या. सी.एल. थूल

नाशिक, दि. 07, मार्च - समाजातील भेदाभेद मिटवण्यासाठी निर्माण झालेल्या कायद्यांचा वापर प्रभाविपणे होण्यासाठी आणि समाजातील वातावरण चांगले राहण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात या विषयांचे ज्ञान दिले जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित ‘नागरी संरक्षण कायदा, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम’ या विषयावरील विभागीय क ार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त आर.आर. माने, बार्टीचे प्रकल्प संचालक लक्ष्मीकांत देशमुख, समाजकल्याण उपायुक्त (पुणे) सदानंद पाटील, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल आदी उपस्थित होते. 
न्या. थुल म्हणाले, समाजातील मागास, दुर्बल घटकापर्यंत कायद्यांची माहिती पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातील प्रश्‍न सोडवून जीवन सुसह्य व्हायला हवे. त्यासाठी काम करणार्‍या विभागांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.