Breaking News

विवाहितेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी दोषींवर कारवाई करा नातेवाईकांची थेट मुख्यमंत्र्याकडे मागणी


शिर्डी/प्रतिनिधी - राहाता तालुक्यातील शिंगवे माहेर असलेल्या विवाहितेचा नांदगाव तालुक्यातील धनेर येथे सासरी विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मयत विवाहितेच्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.

शिंगवे {राहाता} येथील वत्सला शंकर पवार यांची मुलगी लता हिचा विवाह सुमारे दिड वर्षांपूर्वी धनेर {ता. नांदगाव जि. नाशिक} येथील गणेश चिंतामण माळी याच्याबरोबर झाला होता. याकाळात ती सासरी नांदत असताना सासरच्यांनी तिचा मोटार सायकल घेण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान, दि.६ डिसेंबर २०१७ रोजी ती सासरी नांदत असताना तिचा मृतदेह गावचे पोलिस पाटील राजू पाटील यांच्या विहिरीत आढळला. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार नांदगाव पोलिसांनी विवाहितेचा पती गणेश चिंतामण माळी, सासरा चिंतामण धोंडीराम माळी, सासू जिजाबाई चिंतामण माळी आदींच्या विरोधात {भादंवि. ३०६, ४९८, (अ) ३२३, ५०४, ३४ प्रमाणे } गुन्हा दाखल केला.

विवाहितेच्या या मृत्यूप्रकरणाचा घटनाक्रम पाहता तिचा मृत्यु संशयास्पदरित्या झाला आहे. त्यामुळे आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी नांदगाव पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी स. पो. नि. वांगडे यांच्याकडे केली. 

दरम्यान, ‘आता गुन्हा दाखल झाला आहे, काही करता येणार नाही’ असे वांगडे यांनी फोनवर सांगून मयत महिलेच्या नातेवाईकांना भेटण्याचे टाळत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच मयत लता हिने मृत्युपूर्वी ती गरोदर असल्याचे सांगितले होते. मात्र शसवविच्छेदन अहवालात याची नोंद का नाही, याची विचारणा केली असता नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आर. एन. बोरसे यांनी ‘आम्हाला वेळ नाही’ असे उर्मट उत्तर दिल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

ज्या विहीरीत मयत विवाहितेचा मृतदेह तिचे प्रेत आढळले, त्या विहीरीचा मालक पोलिस पाटील राजू चव्हाण आहे. हे कुटुंब चव्हाणकडे काम करून वास्तव्य करत होते. त्यामुळे चव्हाण यानेच यंत्रणा हाताशी धरुन मुलीचा घातपाट केला आहे. त्यामुळे त्यालाही सहआरोपी करावे. तपासी अधिकारी स. पो. नि. वांगळे, डॉ. बोरसे यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्याविरुध्द्व कारवाई करुन त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी मयत लताची आई वत्सला शंकर पवार यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, गृहमंत्री केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत, नाशिक जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.