Breaking News

अल्पसंख्याकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे - आ. डॉ. तांबे


संगमनेर प्रतिनिधी - शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा मुलभूत मार्ग आहे. राज्यशासनाकडून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविल्या जाणार्‍या उपाययोजना सध्या दुर्लक्षित झाल्या आहेत. परिणामी अनेक विद्यार्थी विविध शैक्षणिक समस्यांमध्ये अडकले आहेत. शासनाने तातडीने त्यांच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली.

विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ९३ च्या सूचनेनुसार आ. डॉ. तांबे यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. आ. डॉ. तांबे म्हणाले, अल्पसंख्याक समाजाचे विद्यार्थी शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात. केंद्रशासनाकडून राज्याला प्राप्त झालेल्या शिष्यवृत्ती निधीपैकी बहुतांशी निधी वापरला जात नाही. शिष्यवृत्तीसाठी बँकेत खाते उघडण्यास त्रास होतो. त्यामुळे झिरो बॅलन्स खाते उघडण्यास शासनाने बँकांना निर्देश द्यावेत. सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी. सध्याची शिष्यवृत्ती ही खूपच कमी आहे. त्यात भरीव वाढ व्हावी. 

दरम्यान, आ. डॉ. तांबेंच्या या प्रश्‍नाला उत्तर देतांना राज्याचे अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले, झिरो बॅलन्स खाते उघडण्यास बँकांना निर्देश देण्याचे तसेच केंद्राकडे कोटा वाढवून घेण्याचे प्रयत्न करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. आ. डॉ. तांबे यांच्या या मागणीमुळे राज्यातील हजारो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.