Breaking News

सरकारला तेढ निर्माण करायची आहे का ? : मुंंडे

भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला. संभाजी भिडेला अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत. संभाजी भिडे याला अटक का होत नाही असा सवाल करतानाच धनंजय मुंडे यांनी सभागृहातील सर्व विषय बाजुला ठेवून भिडे यांच्या अटकेबाबत चर्चा व्हावी अशी मागणी केली. सोमवारी विधानपरिषदेमध्ये संभाजी भिडे याला अटक का करण्यात आली नाही याविषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी सभागृहामध्ये आमदार भाई जगताप, आमदार कपिल पाटील, आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही संभाजी भिडे याच्या अटकेची मागणी केली. दरम्यान रत्नागिरीच्या खेड येथेही रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची विटंबना झाली आहे. एकीकडे भीमा कोरेगाव प्रकरण ताजे असताना अशापध्दतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची विटंबना सुरु आहे. या सरकारमध्ये महापुरुषांच्या पुतळयांची विंटबना सुरु असून, समाजकंटकांना सरकारची भीती राहिलेली नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. रत्नागिरी-खेड प्रकरणातही सरकारने निवेदन करावे अशी मागणीही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.


दरम्यान, विधानसभेत अध्यक्षांवरील विश्‍वासदर्शक ठरावाशिवाय सभागृहाचे कामकाज होऊ शकत नाही. 23 (1) नियमातील तरतुदींची पुर्तता करून, संविधानिक पद्धतीने सभागृहात अध्यक्षांवरील विश्‍वास दर्शक ठराव मांडण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत विरोधकांनी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या संदर्भात अविश्‍वास ठराव मांडला होता. यासंदर्भात शासनाने अध्यक्षांवर विश्‍वासदर्शक ठराव मांडला त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, विश्‍वासदर्शक ठरावाशिवाय कामकाज होऊ शकत नाही. 179 अंतर्गत अध्यक्षांच्या पदाला संरक्षण देण्यासंदर्भात तरतूद आहे. अध्यक्षांवरील विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याची 23 (1) अन्वये नोटीस देण्यात आली होती. 23(1) नियमाच्या तरतुदीची पूर्तता करून प्रस्ताव मांडला. आवाजी पद्धतीने सभागृहाने तो मंजूर केला आहे. प्रथा परंपरेनुसार सदनाचेकामकाज सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.