Breaking News

आंबोलीत होते सुरक्षेत ढिलाई

सिंधुदुर्गनगरी, दि. 01, मार्च - आंबोली पर्यटन स्थळाला गेल्यावर्षी काही अवैध धंद्यामुळे गालबोट लागले होत. यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी नियमन आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार आंबोलीतील पर्यटन स्थळी विनापरवाना जाण्यासाठी एक महिना बंदी होती. ही बंदी 21 डिसेंबर 2017 ला संपली असली तरी पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 


गेल्या तीन चार वर्षांमध्ये आंबोली परिसर आणि तिथल्या घाटमार्गात अवैध धंदे वाढल्याने पर्यटनदृष्टया महत्त्वाच्या अशा या पर्यटनस्थळाची वारंवार नाहक बदनामी होत आहे. यामुळे पर्यटनाला फटका बसत आहे. मात्र तरीसुद्धा पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करून बसल्याच दिसत आहे. गतवर्षी उघडकीस आलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी येथील पर्यटन स्थळांवर 22 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर असा एक महिना सायंकाळी सहा ते सकाळी 6 विनापरवाना जाण्यास मनाई होती. तसेच मुख्य रस्त्यावरच्या कावळे शेत फाटा येथे तपासणी नाका सुरू करण्यात आला होता. मात्र हा तपासणी नाकाच वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने अवघ्या काही दिवसात तो बंद करण्यात आला. तेव्हापासून आत्ताची स्थिती जैसे थेच आहे. यामुळे अवैध धंदेवाल्यांना पुन्हा मोकळीक मिळाल्या सारखीच आहे. पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर या संबंधी उपायोजना करणे गरजेचे आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कावळे शेत पॉइंट व महादेवगड पॉइंटकडे जाणार्‍या रस्त्यावर गेट बसवून सायंकाळी सहानंतर जाण्यास बंदी घालावी तसेच पोलिस पेट्रोलिंग असावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.