Breaking News

अंबामाता मुक्ती आंदोलनः जातीअंताच्या दिशेने एक क्रांतिकारक पाऊल!

पंधरावी खेप...!
प्रा. श्रावण देवरे
बहुजनांनो.... ! 
आमचे फेसबुक मित्र निरज धुमाळ व विशेष करून कॉ. भारत पाटणकर यांचे खास अभिनंदन केले पाहिजे कि, ते बहुजनसमाजाच्या सांस्कृतिक क्रांतीची मुहुर्तमेढ करीत आहेत. बहुजनसमाजाचे सर्वात मोठे अनन्य वैशिष्ट्य हे आहे की तो, मातृसत्ताक आहे. त्याच्या या अनन्य वैशिष्ट्याला नष्ट करण्याचा प्रयत्न इतिहास-पुराण काळापासून आर्य-भट करीत आलेले आहेत. किंबहुना हा प्रयत्न म्हणजे एक प्रदिर्घ संघर्ष परंपराच आहे. गेल्या 5 हजार वर्षांच्या काळातील हा सांस्कृतिक संघर्ष आजही सुरूच आहे. 

ज्या प्रजेवर बिनधास्त राज्य करायचं असतं, त्या प्रजेचं सांस्कृतिक मुळ उखडून टाकायचं असतं, हे जगाच्या पाठीवर फक्त आर्यांनीच मांडलं व सिद्दही करून दाखवलं! जगज्जेत्या सिकंदरापासून साम्राज्यवादी इंग्रजांपर्यंतच्या सर्वच विजेत्यांनी शस्त्र, अस्त्र, धर्म, गणिमी कावे, डावपेच, लष्करी ताकद, बाजारपेठ वगैरे साधने वापरून राज्ये जिंकलीत व तेथील प्रजेवर सत्ताही स्थापित केली. मात्र या सगळ्या जगज्जेत्यांपेक्षा आर्य-भट वेगळेच आहेत. जगातील सर्व जेते व राज्यकर्ते आपली सत्ता 100-200 वर्षांपेक्षा जास्त टिकवू शकले नाहीत. आर्य-भट हे मात्र 5000 वर्षानंतरही सत्ता टिकवून आहेत. सुरूवातीच्या संक्रमण काळातील मैदानी युद्धात आर्य पराभुतच होत गेलेत. त्यांचे तत्कालीन सरदार असलेले वामन, नरसिंह, परशुराम वगैरे लढवैय्ये मैदानी युद्धात कधीच जिंकले नाहीत, जिंकू शकतही नव्हते. ते जिंकलेत ते केवळ ‘सांस्कृतिक’ युद्धात! आणि त्यामुळेच ते बनलेत या देशाचे सर्वसत्ताधारी! 
ब्राह्मणवादाच्या विरोधात आपण बहुजनांनी अनेक लढाया करून पाहिल्या. राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रादेशिक असे सर्व संघर्ष केल्यावरही ते अपराजित आहेत. आर्यांच्या विजयाचे मुख्य गमक असलेले सांस्कृतिक युद्ध आपण केले तरच खर्या अर्थाने जातीअंताचा लढा पुढे जाईल. कॉ. भारत पाटणकर व त्यांचे सहकारी यांनी हा लढ केवळ अंबामाता पुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. त्याला व्यापक करीत तो सर्व कुलमाता व गणमातांची मुक्ती ब्राह्मण धर्मातून केली पाहिजे. हा लढा केवळ भावनिक न राहता शास्त्रशुद्धपणे वैचारिक व तात्विक असला तरच तो शेवटास जाईल. त्यासाठी पुढीलप्रमाणे मांडणी होणे आवश्यक आहे..
1) तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी जो ऐतिहासिक द्वंदात्मक भौतिकवाद (खपवळरप चरींशीळरश्रळीा) सिद्ध केला त्याप्रमाणे- बळीपतनानंतरचा या देशाचा इतिहास ब्राह्मण-अब्राह्मण संघर्षाचा आहे.
2) परंतू प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद् पाटील यांनी सिद्ध केल्याप्रमाणे हा संघर्ष बळीराजाच्या पतनापासून नव्हे तर, स्त्रिसत्ताक गणराज्यातील क्षत्र-ब्रह्मण या दोन ‘अशत्रूभावी’ वर्णांच्या संघर्षापासून सुरू होतो. परंतू हा संघर्ष वरकड उत्पादनविहीन असल्यामुळे अशत्रूभावी होता.
3) क्षत्रवर्णाचे सर्वंकष वर्चस्व असलेल्या स्त्रीसत्ताक गणराज्यात त्यांची स्वतःची तांत्रिकी श्रुती होती. त्यांचा स्वतःचा धर्मपूर्व धर्म ‘’कुलधर्म’’ होता. 
4) नव्या उत्पादन साधनांच्या कारणास्तव उत्पादन शक्ती बदलल्यात व परिणामी उत्पादनसंबंधही बदललेत. त्यातून क्षत्र-ब्रह्मण संघर्ष अपरिहार्य होता. वर्णविभागणीचे मुख्य कारण असलेले क्षत्र-क्षेत्र-जमिन ही कसण्यासाठी परूषांकडे संक्रमित होत असतांना समाजाचेही धृवीकरण झाले. स्त्रिया वर्णहीन झाल्यात. ब्रह्मण वर्ण सर्वेसर्वा होऊन धार्मिक अधिकारही त्याच्याकडे आलेत. जित गणांना मारून टाकण्याऐवजी त्यांना ‘दास’ बनवून उत्पादन साधनांना जुंपून उत्पन्न वाढविले. हा संक्रमण काळ होता. 
5) या काळात उत्पादनाची साधने जरी ‘पुरूष-ब्रह्मण’ वर्णाकडे असली तरी सांस्कृतिक सत्ता कुलधर्माच्या माध्यमातून स्त्रियांकडेच होती. जमिन गणाची मालमत्ताच राहिली. त्यामुळे पुर्ण पुरूषसत्ताक व्यवस्था आलीच नाही. स्त्रीसत्ता जरी गेली तरी मातृवंशकता तशीच राहिली. कुलधर्मही राहिला. आजही आपण कडकपणे कुलधर्म पाळतो.
6) या संक्रमण काळात क्षेत्रधारी (जमिनधारी) वर्ण क्षत्रिय झाला, कर्मकांडाचे विधी करणारा (शुक्राचार्य, वसिष्ठ वगैरे)परूष ब्रह्मण वर्णाचा झाला. जित गणाचे लोक दास वर्णाचे झालेत. या गणसमाजात वर्चस्व मात्र क्षत्रियांचे होते. 
7) त्रैवर्ण्य दासप्रथाक मातृवंशसत्ताक गणराज्याच्या अंतिक टप्प्यात आर्य टोळ्यांचे आगमन झाले. त्यांच्याशी झालेल्या जमिनी युध्दात बळीराजा पासून नरकासूरांपर्यंतचे राजे यशस्वीपणे लढले. नंतरच्या सहअस्तित्वमय संघर्ष व तडजोडींमधून आर्यांच्या प्रभावाखाली भारतीय समाज चातुर्वर्ण्यमय झाला. ब्रह्मण वर्णावर कब्जा करीत आर्य ‘ब्राह्मण’ झालेत. स्त्रीसत्ताक गणसामाजाच्या तांत्रिकी श्रुतिची तोडमोड करून वैदिक श्रुती तयार केली, त्यालाच आज ‘वैदिक श्रुती’ म्हटले जाते. कर्मकांडाला महत्व प्राप्त करीत ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ झाला.
8) या विश्‍लेषातून एक मुद्दा सिद्ध होतो की, भारतातील मुलभूत संघर्ष हा वैदिक-अवैदिक असा नसून तो ‘’ब्राह्मणी-अब्राह्मणी’’ असाच आहे. आजच्या संदर्भात व्याख्या करायची तर जात-वर्ण-वर्ग-स्त्रीदास्याचे समर्थन करणारा तो ब्राह्मणी छावणीचा सदस्य व या छावणीच्या विरोधात संघर्ष करणारा तो अब्राह्मणी छावणीचा सदस्य होय. राजवाडे सांगतात त्याप्रमाणे ब्राह्मणी छावणीचे नेतृत्व नेहमीच ब्राह्मण करीत राहीले आहेत व अब्राह्मणी छावणीचे नेतृत्व शूद्र व अस्पृश्य! 
9) या ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षात क्षत्रिय व वैश्य वर्ण-जाती आपल्या हितसंबंधांखातर कधी ब्राह्मणी छावणीत तर कधी अब्राह्मणी छावणीत जात होते. 
10) आजही स्वतःला वैश्य व क्षत्रिय समजणारे लोक ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. फक्त आरक्षणासारख्या स्वार्थी मागण्यांसाठी ते शूद्रांमध्ये येऊ इच्छितात.
कॉ. भारत पाटणकर व कॉ. निरज यांना अंबामाता मंदिराची सुटका केवळ वैदिक धर्मातून करून चालणार नाही तर, एकूणच ब्राह्मणी छावणीतून सुटका करावी लागेल. तरच तो संघर्ष मातृपरंपरेप्रमाणे समतावादी होईल निकरालाही जाईल. या लढ्यात त्यांना जात-अस्मिता बाजूला ठेवावी लागेल. छत्रपती शिवराय हे जोपर्यंत स्वराज्याला ‘भवानी मातेचे राज्य समजत होते तोपर्यंत मावळे हे गणबंधू म्हणून मित्र व सल्लागार होते. मात्र ब्राह्मण नोकर सल्लागार बनताच गणमाता जाऊन गणपती आला व स्वराज्य जाऊन ‘पेशवाई’ आली. या पासून धडा घेऊन अंबामाता मुक्तीचे आंदोलन मर्यादित न ठेवता समस्त स्त्री-शुद्रादिअतिशुद्रांचे करावे. त्यामुळे हे आंदोलन कोल्हापुरातून बाहेर येऊन समस्त कुलमाता-गणमातांच्या मुक्तीचे आंदोलन होईल व जातीअंताच्या सांस्कृतिक युद्दाला सुरूवात होईल. या सांस्कृतिक युद्धाची मांडणी करणारी पुस्तिका लवकरच प्रकाशित करण्यात येईल.
सत्य की जय हो!!
Mobile - 88 301 27 270 
Email- s.deore2012@gmail.com