Breaking News

भऊर येथे विजतारेमुळे शेतातील मका चारा जळून खाक

देवळा, दि. 08 मार्च - देवळा तालुक्यातील भऊर येथील रामचंद्र सुकदेव पगार यांच्या शेतात वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने लागलेल्या आगीत साठवणूक केलेला 18 ट्रॉली मका चारा जळून खाक झाला. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजता घडली असून यात शेतकर्‍याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
भऊर-देवळा रस्त्यावरील पूर्व प्राथमिक शाळेलगत असलेल्या आपल्या शेतात रामचंद्र पगार यांनी उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या चारा टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर 18 ट्रॉली मक्याचा चारा विकत घेऊन साठवणूक करून ठेवला होता. चार्‍यावरून वीज कंपनीच्या वीज वाहक तारा गेलेल्या होत्या. लोंबकळणार्‍या तारांवर पक्षी बसल्यामुळे शॉर्टसर्कीट झाले व ठिणग्या पडून मक्याच्या चार्‍याने पेट घेतला.

आग लागल्यानंतर परीसरातील शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व पुरुष, महिला सर्वांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दिनकर पगार यांनी देवळा पोलीस ठाण्यात अग्नीशमन दलाच्या बंब साठी संपर्क साधला. देवळा तालुक्यात अग्नीशामक दलाची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे सटाणा येथून नगरपालिकेचा बंब मागवण्यात आला. परंतु बंब येईपर्यंत उशीर झाला होता. आगीत चार्‍याची पूर्णपणे राख झाली. 
वीज कंपनीच्या लोंबकळत्या तारांमुळे शॉर्टसर्कीट होऊन शेतातील ऊस व चार्‍याला आग लागण्याची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे. महिनाभरापूर्वीच सुकदेव पवार यांच्या शेतात वीज वाहक तारांवर पक्षी बसल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन चार्‍याला आग लागली होती. भऊर येथे लोंबकळणार्‍या तारांबाबत शेतकर्‍यांनी वीज कंपनीकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही वीज कंपनीने यात कुठल्याही प्रकारची दुरुस्ती केली नाही.