Breaking News

गावकरी ग्रामविकास पॅनलचा सरपंच पदासह सात जागेवर दणदणीत विजय


शेवगाव तालुक्यातील देवटाकळी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव खरड व माजी सरपंच अशोक मेरड यांच्या नेतृत्वाखाली गावकरी ग्रामविकास पॅनलचा सरपंच पदासह सात जागेवर दणदणीत विजय मिळविला. तर ज्ञानेश्‍वर ग्रामविकास मंडळाला अवघ्या दोनच जागेवर समाधान मानावे लागले. भाजपच्या जनसेवा ग्रामविकास पॅनलला साधे खातेही उघडता आले नाही. जनतेतील पहिला सरपंच पदाचा मान सुभद्रा खरड यांनी मिळविला, देवटाकळी (ता. शेवगाव) ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी सुभद्रा खरड, रेखा मेरड, सुमैया शेख, सविता रविंद्र खरड यांच्यामध्ये चौरंगी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत दोन गटातच खरी लढत झाली आहे. मुसा शेख यांनी भाजपा पुरस्कृत जनसेवा ग्रामविकास स्वतंत्र पॅनल निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे निवडणूक प्रचारात रंगत आली होती.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील या गावात भाजपचा धुव्वा उडाला असून नेतृत्व चालकालाही मतदारांनी नाकारले आहे. नवनिर्वाचित महिला सरपंच, व सर्व सदस्यांचे माजी आ. नरेंद्र घुले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जि.प. उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती क्षितीज घुले यांनी कौतुक केले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाल्मिक सुडके यांनी काम पाहिले.निकालानंतर गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.