Breaking News

नाशिकमधील औद्योगिक वसाहतीमधील पायाभूत सुविधांचे प्रश्‍न प्रलंबित - आ. जयवंतराव जाधव

मुंबई / नाशिक, दि. 20, मार्च - गेल्या अकरा महिन्यांपासून नाशिक जिल्हा उद्योग मित्र (झूम) समितीची बैठक न घेतल्यामुळे नाशिकमधील औद्योगिक वसाहतींचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असल्याचे आ.जयवंतराव जाधव यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले.


औचित्यांद्वारे बोलताना आ.जाधव म्हणाले की, उद्योगांचे प्रश्‍न एकाच व्यासपीठावर सुटावेत यासाठी राज्य शासनाने जिल्हा उद्योग मित्र समिती (झूम)ची स्थापना केली असून तिच्या अध्यक्षस्थानी खुद्द जिल्हाधिकारी असतात. एमआयडीसीपासून पोलीस आणि महापालिकेपर्यंत उद्योगांशी संबंधित सर्वच विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित रहावेत आणि उद्योग संघटनांनी मांडलेले प्रश्‍न मार्गी लागावे या उद्देशाने दर तीन महिन्यांत एकदा तरी बैठक अपेक्षित आहे. जिल्हा उद्योग मित्र बैठकीच्या व्यासपीठावरून उद्योगांशी निगडीत अनेक प्रश्‍न उद्योजकांच्या संघटना मांडत असतात, त्याशी निगडीत विभागांचे अधिकारी उपस्थित असल्याने हे प्रश्‍न तत्काळ मार्गी लागावेत अशी अपेक्षा असते. मात्र, काही वर्षापासून नाशिकमध्ये या बैठकीबाबत जिल्हा उद्योग केंद्राला फारसे गांभीर्य नसल्याचे वारंवार समोर आले आहे. नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून या बैठकीला ग्रहण लागले असून समन्वयकाच्या भूमिकेत असलेल्या जिल्हा उद्योग केंद्रांच्या दुर्लक्षामुळे तब्बल 11 महिन्यांपासून ही बैठक झालेली नाही, एप्रिल 2017 ला मागील बैठक झाली होती, त्यानंतर बैठकच झालेली नाही. यामुळे उद्योगांचे अनेक प्रश्‍न गंभीर बनत चालले आहेत. आयमा आणि निमाने सदर बैठकीच्या अनियमित आयोजनाची तक्रार करूनही बैठक न घेतल्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहेत तरी याबाबत शासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आ. जयवंतराव जाधव यांनी सभागृहात केली.