Breaking News

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग अध्यक्षांनी घेतला सुविधांचा आढावा

नवी मुंबई, दि. 20, मार्च - नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सफाई कर्मचारी सुविधांचा आढावा राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मनहर वालजीभाई झाला यांनी आज घेतला. या वेळी सफाई कर्मचा-यांच्या हितासाठी अधिक चांगले काम व्हावे, अशी अपेक्षा भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष वालजीभाई यांनी व्यक्त केली. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन साफसफाई पध्दती, कर्मचा-यांना दिले जाणारे वेतन, त्यांची आरोग्य तपासणी, कामाचे तास, सुरक्षा साधणे, चेंजींग रुम व्यवस्था अशा विविध बाबींबाबत त्यांनी बारकाईने माहिती घेतली. स्वच्छ भारत मिशनमुळे संपूर्ण भारतात स्वच्छतेचे वारे वाहताना दिसत असून सफाई कर्मचारी हे या अभियानाचा कणा आहेत त्यामुळे त्यांच्या गरजांकडे विशेषत्वाने लक्ष देणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगत आयोगाचे अध्यक्ष मनहर झाला यांनी मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात असलेला नवी मुंबईचा आठवा नंबर यावर्षी उंचावेल अशा शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणाची प्रसिध्दी करताना स्वच्छता कामगारांचा सन्मान करणारे होर्डींग शहरात प्रदर्शित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका सफाई कर्मचा-यांच्या हितासाठी अधिक चांगले काम करेल अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.