Breaking News

भोगवे बीचची आंतरराष्ट्रीय ’ब्लू फ्लॅग’साठी शिफारस


जगभरातील सर्वोत्कृष्ट बीचसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणार्‍या ऑस्कर दर्जाचे ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन दिले जाते. या मानांकनासाठी भारतातर्फे आठ सर्वांगसुंदर बीचची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव सर्वांगसुंदर बीच म्हणून सिंधुदुर्गातील भोगवे या बीचची निवड करण्यात आली आहे. समुद्री पाण्याचा दर्जा, कि नार्‍यावरील स्वच्छता, सोयीस्कर संपर्क, पर्यटक सुरक्षितता, पर्यावरण व्यवस्थापन व योग्य माहितीची देवाणघेवाण या सर्व निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली आहे.

‘ब्ल्यू फ्लॅग’ चे मानांकन देणारे ‘फाऊंडेशन फॉर एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन’ ही प्रमुख संस्था डेन्मार्क येथे आहे. या संस्थेशी संलग्न असलेली भारतातील सेंटर फॉर एनव्हायर्मेंटल एज्युकेशन ही संस्था गोवा येथे कार्यरत असते. या संस्थेचे प्रमुख असलेले सुजित डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ‘ब्ल्यू फ्लॅग’च्या अटी-शर्थीत बसू शकतील, अशा देवगड, मालवण व वेंगुर्ले तालुक्यातील काही निवडक बीचेसची पाहणी करण्यात आली व अंतिमतः भोगवेची या मानांकनासाठी निवड करण्यात आली. याच संस्थेमार्फत या किनारपट्टीवर गॅप नॅलिसीसची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्रातून फक्त भोगवे बीचची निवड करण्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी उदय चौधरी, जि. प. चे कमलाकर रणदिवे व स्थानिक ग्रामसेवक शिंदे यांच्या अथक मेहनत व सहकार्यातून या बीचची निवड झाली आहे.