शिंदे आत्महत्या प्रकरण, नऊ जणांना सशर्त जामीन
सोलापूर, दि. 19, मार्च - शासकीय विश्रामगृहात गळफास घेऊन भानुदास शिंदे (रा. म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर) यांनी आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यावरून नऊ जणांना अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी मंजूर केला. आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. अशोक लांबतुरे, सुरेखा लांबतुरे, मधुकर गवळी, अलका गवळी, शंकर जाधव, पांडुरंग कांबळे, विलास इरकशेट्टी, नागनाथ बनसोडे, सावळराम शिंदे यांना जामीन मिळाला आहे. 16 फेब्रुवारी रोजी शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्व चिठ्ठीत त्यांनी वरील नऊजणांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार करीत असल्याचे म्हटले आहे. त्यांची पत्नी संस्थेत कामाला आहेत. त्यांना वरील संचालक मंडळ त्रास देत होते. यामुळे हा प्रकार केल्याचे म्हटले होते. युवराज शिंदे यांनी सदर बझार पोलिसात तक्रार दिली होती. अटक टाळण्यासाठी जामीनासाठी अर्ज केला होता. 20 व 21 मार्च तपास अधिकारी यांच्यासमोर तर दर रविवारी अकरा ते एक यावेळेत पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे. सरकारतर्फे वामनराव कुलकर्णी, सात आरोपीतर्फे धनंजय माने, जयदीप माने, एकातर्फे नीलेश जोशी तर रामभाऊ रिसवूड आणि मूळ फिर्यादीतर्फे एन. आर. मुसळे या वकिलांनी काम पाहिले.