सिमेन्स प्रकल्पाच्या उद्घाटनास मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांचा लवाजमा येणार म्हणून शनिवारी सायंकाळी 8 वाजेपर्यंत विद्यापीठ परिसरासह सिमेन्स प्रकल्प येथे हजारो रुपये खर्च करून जय्यत तयारी करण्यात आली. परंतू अचानक मुख्यमंत्र्यांचा दौराच रद्द झाल्याचे वृत्त आल्याने या सर्व तयारीवर पाणी पडले. दौरा रद्द होण्यामागचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नसल्याने जिल्ह्यात तो चर्चेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात कृषी विद्यापीठ येथे 2013 साली तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात मा. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी 250 कोटी रुपये खर्चाचा 100 एकर क्षेत्रावर सिमेन्स (वळू) प्रकल्प मंजूर केला होता. हा प्रकल्प सुरु होऊन 2 वर्ष झाले असून या प्रकल्पाचे उद्घाटन केले गेले नसल्याचे लक्षात येताच प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर राज्य मंत्रीमंडळातील 5 मंत्री, खासदार, आमदार व अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार होते. मागील आठ दिवसांपासून राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व एनडीडीबी डेअरी सर्विसेस तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिकारी यांची यासाठी धावपळ सुरु होती. या कार्यक्रमासाठी दोन वेळा कार्यक्रम पत्रिका छापण्यात आल्या होत्या. जिथे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार होते तिथे सुंदर फुलांची सजावट करुन व्यासपीठ तयार करण्यात आले. मुख्यमंत्री येणार म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे पोलिसांचा लवाजमा तसेच केंद्रातील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिकारी यांची व्यवस्था, पाहुणचार तसेच कृषी विद्यापीठ येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृह परिसरात प्रदर्शन व मुख्य कार्यक्रम होणार असल्याने तिथेही सर्व तयारी करण्यात आली होती. तसेच जेवणासाठी विद्यापीठाच्या अतिथीगृहात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. परंतू शनिवारी राञी अचानक मुख्यमंत्र्याचा दौरा रद्द झाल्याची बातमी धडकताच तालुक्यासह जिल्हात अनेक चर्चेला उधान आले आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द ; जय्यत तयारीवर पाणी हजारो रूपयांचा खर्च व्यर्थ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:45
Rating: 5