Breaking News

उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे -उपराष्ट्रपती

उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.ते आज हॉटेल ताज येथे मिंट वृत्तपत्रातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या ‘मिंट कार्पोरेट स्ट्रॅटेजी’ पारितोषिक प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे उपस्थित होते.श्री. नायडू म्हणाले, देशाच्या विकासात उद्योजकांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे देशाचा विकास दर सातत्याने वाढत आहे. इज ऑफ डुइंग बिझनेसमुळे उद्योगांना अनेक फायदे झाले आहेत. मॅग्नेटिक इंडिया मुळे जगातील उद्योजकांनी भारतात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. प्रधानमंत्री मोदी सरकारने जाहीर केलेल्या नव्या फायदेशीर धोरणाचे हे फलित आहे. उद्योग उभारणीसाठी अनेक सोयीसुविधा दिल्याने उद्योजक आकर्षित झाले आहेत. पारदर्शीपणाला प्राधान्य दिल्याने उद्योगधंद्यांना गती प्राप्त झाली आहे. देशात लागू केलेल्या नोटाबंदी, जीएसटीचा फायदाच झालेला आहे. शेअर्स, फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फायदा झाला पाहिजे. उद्योजकांनी पारदर्शी कारभारातून समाजाचे कल्याण साधले पाहिजे, असे सांगून त्यांनी पारितोषिक प्राप्त उद्योगपतींचे व मुख्य अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.