उंदरांमुळे मिरच्या झोंबल्या : मुंडे
राज्यात सध्या गाजत असलेल्या उंदीर घोटाळ्यामुळे सरकारच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. मृत व्यक्तिच्या संस्थेला काम कसे दिले, 3 लाख गोळ्या मंत्रालयात ठेवल्या असतील तर पावलोपावली गोळ्या दिसायला हव्या होत्या, मात्र पारदर्शक कारभार असूनही मंत्रालयात ना या गोळ्या दिसल्या ना मेलेले उंदीर दिसले, असा टोला त्यांनी लगावला. सरकारच्या मागील साडेतीन वर्षाच्या काळात इतके घोटाळे झाले आहेत की, प्रत्येक अधिवेशनात आम्ही अंतिम आठवडा प्रस्तावात पुरावे मांडायचे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिन चिट द्यायची, अशी प्रथा आणि परंपराच झाली असल्याचा चिमटा सरकारला काढला. किमान सरकारच्या या शेवटच्या अधिवेशनात तरी मुख्यमंत्री ही प्रथा आणि परंपरा मोडून दोषींवर कारवाई करतील, अशी अपेक्षा शेवटी व्यक्त करत भाजपाचेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या तन मे राम, मन में राम, या कवितेला उद्देशून सध्याची भाजपा मात्र केवळ आया राम, गया रामचा विचार करीत असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी कितीही या मंत्र्यांना आणि अधिकार्यांना क्लिन चिट दिली तरी या सरकारविरुध्दचा आपला संघर्ष आणि लढा थांबणार नाही, असे सांगत कोशिष करने वालों की, कभी हार नही होती, ही कविताही वाचून दाखवली.इतरांना वाचविता वाचविता एक दिवस मुख्यमंत्रीच या घोटाळ्यांमध्ये अडकल्याशिवाय राहणार नाहीत, असाही इशारा त्यांनी दिला.