Breaking News

‘मेस्मा’वरून विधानसभेत प्रचंड गोंधळ

मुंबई : विधानसभेच्या सभागृहात बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍नावरून विधानसभेत शिवसेना-भाजपच्या आमदारांनी परस्परविरोधी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. सभागृहात सत्ताधारी सेना-भाजपचे जोरदार भांडण सुरू असताना मात्र विरोधी पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधार्‍यांचा गोंधळ पाहत राहिले. प्रश्‍नोत्तराचा तास सुरू झाल्यावर शिवसेनेच्या आमदारांनी अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ कायदा रद्द करण्याची मागणी करत सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर सेना आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज 3 वेळा तहकूब करावे लागले. 
‘मेस्मा’ रद्द करण्यासाठी बुधवारी विधान परिषदेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यासाठी सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य वेलमध्ये उतरले होते. त्यामुळे 22 मिनिटांसाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. अंगणवाडी सेविकांना ’मेस्मा’तून वगळण्यासाठी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आज विधानसभेत यासंदर्भात ठाम भूमिका घेत शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घातला. या गोंधळातच अर्थसंकल्पाच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरू होती. 

जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायदा रद्द करत नाही. तोपर्यंत सभागृहात आंदोलन सुरूच राहणार, असा पुनरुच्चार सुनील प्रभू यांनी केला. त्यानंतर विधानसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारी कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या सर्व सुविधा अंगणवाडी कर्माचाऱयांना द्या आणि नंतर मेस्मा लावा, अशी मागणी केली. मेस्मा ही सरकारची जबरदस्ती आहे. ज्यांच्यामुळे या राज्यात कुपोषण कमी झाले त्या अंगणवाडी सेविकांना आंदोलन करावे लागते, ही मोठी शोकांतिकाच आहे. 21 दिवस आंदोलन सुरू असल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य करून का घेतल्या नाहीत? खासगी कंत्राटदारांचे पैसे आणि त्यांचे बिले तत्काळ देता. मग, अंगणवाडी सेविकांची बिले का 6 महिन्यांपासून रखडवली जातात, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. जोपर्यंत अंगणवाडी सेविका यांच्यावरील मेस्मा काढला जात नाही. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.