Breaking News

दखल - मायावती-अखिलेशचं शहाणपण; भाजप बिथरला

गेल्या 25 वर्षांत एकमेकांचा प्राण्यांच्या उपमा देऊन उद्धार करणार्‍या समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाला भाजपच्या वाढत्या प्रभावानं एकत्र आणलं आहे. उत्तर प्रदेशात आजवर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्ष (सप) हे आता एकत्र येत आहेत. त्यांच्या एकत्र येण्यास भाजप कारण ठरला आहे. उत्तर प्रदेशात भाजपनं समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाची सद्दी संपविली. लोकसभेत बहुजन समाज पक्षाला एकही जागा मिळाली नाही. विधानसभेत फक्त 19 जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाच्या जागाही पन्नासच्या आत आल्या. अशीच परिस्थिती राहिली, तर समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाचं अस्तित्त्व संपेल, अशी भीती आहे. त्यामुळं या दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.
ईशान्येत भाजपनं जोरदार मुसंडी मारल्यानं उत्तर प्रदेशात होणार्‍या फुलपूर आणि गोरखपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी बसपच्या बैठकीत सपच्या उमेदवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यसभा निवडणुकीसाठीदेखील सपच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचं बसपनं ठरवलं आहे. गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या जागांवर 11 मार्च रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. या दोन्ही जागा भाजपसाठी विशेष महत्त्वाच्या आहेत. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा तर फुलपूर हा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा लोकसभा मतदार संघ आहे. मात्र, या दोघांनी राजीनामा दिल्यानंतर या जागा खाली झाल्या आहेत. आता या पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी बसपनं आपला कट्टरविरोधी पक्ष असणार्‍या समाजवादी पक्षाला समर्थन देण्याची घोषणा केली आहे.

उत्तरप्रदेशात 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. त्या वेळी भाजपचे मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मुलायमसिंह यादव व मायावती हे एकत्र आले. दोन्ही पक्षात युती झाली होती. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवून यश मिळविलं. दीड वर्षे त्यांचं सरकार टिकलं. त्यानंतर गेस्ट हाऊस कांड झालं. मायावती यांचा अवमान करण्यात आला. तेव्हापासून दोन्ही पक्षांत कमालीचं वितुष्ठ होतं. नंतर तर मायावतींनी भाजपच्या पाठिंब्यानं सत्ता मिळविली. बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्षानं आलटून पालटून सत्ता भोगली; परंतु दोन्ही पक्ष एकत्र आले नव्हते. या दोन्ही पक्षांतील संघर्ष भाजपच्या पथ्थ्यावर पडला होता. आता तर भाजपनं मायावती यांनाही टार्गेट केलं होतं. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल पाहिले, तर ग्रामीण भागात भाजपला जिथं पर्याय आहे, तिथं लोक पर्यायी पक्षांना मतदान करतात. समर्थ पर्याय लोकांना हवा असतो. निमशहरी व ग्रामीण भागात अजूनही समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाचे बालेकिल्ले शिल्लक आहेत. भाजपचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन हे बालेकिल्ले शाबूत ठेवायचे असतील आणि भाजपच्या विजयाचा वारू रोखायचा असेल, तर दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. अखिलेश यादव यांनी यापूर्वीही तयारी दाखविली होती. मायावती यांना फुलपूर लोकसभा मतदारसंघाची जागा देऊ केली होती; परंतु मायावती यांनीच निवडणूक लढवायला नकार दिला. भाजपनं ईशान्य भारतात मिळवलेल्या विजयानंतर तर भाजपचं आव्हान आणखी वाढलं असल्याची जाणीव मायावती व त्यांच्या पक्षाला झाली असावी. अखिलेश व त्यांचे सहकारी तर संधीची वाटच पाहत होते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी मायावती यांच्यांशी युती करण्याची तयारी दाखविली 
होती; परंतु मायावती यांनीच नकार दिला होता. 

आता सारं संपण्याच्या अगोदर काहीतरी करणं आवश्यक आहे, याची जाणीव झाल्यानंतर तात्पुरती तडजोड म्हणून का होईना हे दोन्ही पक्ष एकत्र आले, हे महत्त्वाचं.मायावतींनी राज्यसभेसाठी समाजवादी पक्षाला समर्थन देण्याचा डाव खेळला आहे, असं राजकीय निरीक्षकांना वाटतं आहे. उत्तर प्रदेशात 23 मार्च रोजी राज्यसभेच्या दहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 19 आमदारांचा बसप एकही जागा जिंकण्याचा स्थितीत नाही. त्यामुळं त्यांना सपकडून एका जागेसाठी समर्थन मिळण्याची आशा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांत युती होणार असल्याची राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू आहे; पण मायावती यांनी सावधपणे या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. लोकसभेच्या दोन जागांसाठीच्या पोटनिवडणुका आणि राज्यसभा निवडणुकीसाठी ‘इस हाथ लो उस हाथ दो’ या तत्वावर हा तात्पुरता समझोता झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बसप पूर्वीप्रमाणंच पोटनिवडणुकीत उतरलेली नाही आणि कार्यकर्त्यांना भाजपविरोधातील सर्वांत तुल्यबळ उमेदवाराला
मत देण्यास सांगितलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

बहुजन समाज पक्षानं राज्यसभा निवडणुकीसाठी सपला पाठिंबा मागितला आहे. माध्यमांत 2019 मधील लोकसभा निवडणुकीसाठी सप आणि बसपमध्ये युती झाली आहे, असं वृत्त छापून आलं असलं, तरी ते वास्तवापासून दूर आहे. उत्तर प्रदेश किंवा इतर कोणत्या राज्यात जेव्हा एखाद्या पक्षाशी युती होईल, तेव्हा ती गूपचूप होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी दुसर्‍या पक्षातील तुल्यबळ उमेदवाराला मतदान करा. उत्तर प्रदेशमध्ये आता लवकरच राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी निवडणुका होणार आहेत. यामध्ये सप आणि बसप एकमेकांना मतदान करतील. बसप आणि सपकडं आपले उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक मतं नाहीत. त्यामुळं आम्ही सपच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. त्यानुसार ते आम्हाला मदत करतील आणि आम्ही त्यांना मदत करू, असं त्यांनी म्हटलं. ज्या दोन पक्षांत विस्तव जात नव्हता, ते या पोटनिवडणुकाच्या निमित्तानं प्रथमच एकत्र आले. दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यामुळं लगेच दोन्ही पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असं नाही; परंतु दलित व मुस्लिम एकत्र आले, तर पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला मागच्या इतक्या म्हणजे 73 जागा मिळविता येणार नाही, हे ही तितकंच खरं. त्यासाठी आताचं एकत्र येणं म्हणजे पुढच्या निवडणुकीसाठी युती करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे, हे यानिमित्तानं स्पष्ट झालं. एकीकडं हे होत असताना भाजपच्या मंत्र्यांची वादग्रस्त विधानांची मालिका चालूच आहे. उत्तर प्रदेशातील मंत्री नंदगोपाल नंदी यांनी विरोधकांवर टीका करतांना केलेल्या वादग्रस्त विधानामुळं चांगलीच खळबळ माजली आहे. त्यांनी भाषण करत असताना मुलायमसिंह हे रावण आहेत, मायावती या शूर्पणखा आहेत, शिवपाल यादव हे कुंभकर्ण आहेत अशी टीका केली. नंदी यांनी विरोधकांवर टीका करतानाच मोदी हे प्रभू राम असून योगी आदित्यनाथ हे रामभक्त हनुमान असल्याचंही विधान केलं आहे. 

फुलपूर इथं होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री प्रचारसभेमध्ये सहभागी झाले होते. या मतदार संघातून कौशलेंद्र पटेल हे निवडणूक लढवत असून त्यांचा प्रचार करण्यासाठी नंदी यांनी केलेल्या भाषणात हे विधान केलं आहे. बेताल विधानं होत असताना योगी आदित्यनाथ हे मंचावरच होते. नंदी यांनी त्यांनी रचलेल्या या कहाणीचा पुढचा अध्याय सांगताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मारीच राक्षसाची उपमा दिली. नंदी हे त्यांच्या बेताल विधानं आणि कार्यकर्त्यांना गुलाम समजण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी कार्यकर्त्यांकडून पाय दाबून घेत असल्याची त्यांची दृश्यं व्हायरल झाली होती.