Breaking News

फलटण मोजणी कार्यालयातील एजंटांमुळे नागरिक अडचणीत


फलटण मोजणी कार्यालयात असलेला एजंटांचा सुळसुळाट आणि त्याला व अधिकार्‍याचा कथीत छुपा पाठिंबा यामुळे मोजणीसाठी, नक्कल प्रतिसाठी हजारो रुपये मोजण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.फलटण येथील मोजणी कार्यालयात व आवारात एजंटांचा विळखा असल्याचे दिसून येत असून कार्यालयात असणार्‍या टेबल व खुर्चीचा तसेच कार्यालयातील कागदपत्रे, संगणक, प्रिंटर याचा वापर करताना ही मंडळी नेहमी दिसतात.

 कार्यालयात जाण्याअगोदरच सावज शोधणारे हे एजंट नागरिकांना गाठतात. सरळ पद्धतीने काम होणारच नाही याची खात्री कार्यालयीन कर्मचारी देतात. त्यामुळे नाइलाजाने नागरिकांना एजंटांशी व्यवहार करावा लागतो. मोजणी करण्यासाठी थेट गेल्यास विविध नक्कल व कागदपत्रे यांची अपूर्णता दाखवून मोजणी करता येणार नाही असे कर्मचारी यांच्याकडून सांगितले जाते. मोजणी होणार नाही म्हणून हताश झालेल्या नागरीकाना असे कार्यालयात उपस्थित असणारे खुर्चीवर बसलेले एजंट अलगत हेरतात व त्यांना एका बाजूला घेऊन मी काम करून देतो असे सांगतात. अर्ज दाखल करणे, नक्कल काढून देणे, मोजणी अर्ज दाखल करणे, चलन काढणे, फी भरणे, नोटीस पाठवणे, मोजणी करण्यासाठी मोजणी मशीन घेऊन जाऊन मोजणी क रणे ही सगळी कामे एजंट करताना दिसतात त्यासाठी हजारो रुपये अलगत उकळतात. मोजणी विषयक कामासाठी आलेल्या नागरिकांना हेरून त्यांना ‘काय काम आहे’ असा प्रश्‍न विचारला जातो त्यामुळे मासा पटकन गळाला लागतो. कार्यालयाच्या परिसरात सध्या तब्बल 5 एजंट सक्रिय आहेत.

एजंटचा इतका मोठ्या प्रमाणावर कार्यालयात सुळसुळाट असणे याला कार्यालयातील अधिकार्‍यांचाही तितकाच छुपा पाठिंबा आहे हे एजंटच्या कार्यालयातील कामकाजातून समोर येते. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित असताना एजंट कर्मचारी यांच्या खुर्चीत बसून संगणक व प्रिंटर तसेच कार्यालयीन महत्वाची कागदपत्रे हाताळतात. कार्यालयातील खुर्चीत बसत असल्याने नागरिकांना हे एजंट असल्याचे लक्षात येत नाही. कार्यालयीन कर्मचारी असल्याचा बनाव ही एजंट मंडळी करतात. शिपाई पासून अधिकार्‍यापर्यत पैशाच्या जोरावर वजन वापरून जी कामे अनेक वर्षांपासून रखडली जातात ती हजारो तरी कधी लाखो रुपयांची देवाणघेवाण करून अगदी एक ते दोन महिन्यात करतात. या एजंट व्यक्तीला कोणी एखाद्या प्रकरणात विरोध केल्यास भूमी अ धिक्षक सातारा कार्यालय, पुणे येथील मुख्य कार्यालय येथील अधिकार्‍याचे वजन वापरून अलगत हे प्रकरण दाबतात. अनेक वेळा पुणे कार्यालय व सातारा जिल्हा भूमी अधिक्षक कार्यालय येथील मुख्य अधिकारी खिशात घेऊन फिरतो अशी भाषा बोलून दाखवताना ही मंडळी दिसतात. 

महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख खात्याने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमानुसार 1 जानेवारी 2012 संपुर्ण राज्यात ई-मोजणी प्रणालीची अंमलबजावणीची सुरुवात झाली. ई-मोजणी प्रणालीच्या खोलात गेल्यावर ई-मोजणी प्रणालीची फायदा नागरीकांना कमी एजंट व्यक्तीला जास्त होताना दिसत आहे. ई-मोजणी प्रणालीचा वापर ही अधिकारी व कर्मचारी मंडळीएजंट व्यक्तीच्या सहाय्याने गैरवापर करतात ही बाब जिल्हा अधिक्षक कार्यालय सातारा व भूमि अभिलेख विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) यांना माहीत असूनही लाभापोटी कारवाई होत नाही अशी खंत नागरिक बोलून दाखवत आहेत.
फलटण मोजणी कार्यालयात एजंट मनमानीपणे कसे कारभार करतात याचे व्हिडिओ व फोटो पाहिल्यावर कार्यालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची प्रचिती येते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट या प्रकरणी कारवाई करून मोजणी कार्यालय एजंट मुक्त करावे व जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकामधून होत आहे.