Breaking News

पाच जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण


जिल्ह्यात विविध नक्षली कारवाया, घातपातांमध्ये समावेश असलेल्या व शासनाने 24 लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केलेल्या पाच नक्षलवाद्यांनी गडचिरोली पो लिसांसमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. यामध्ये दोन महिला नक्षल्यांचा समावेश आहे.

सैनु उर्फ मिरगु झुरू वेळदा (35), रूपी उर्फ झुरी कांडे नरोटे (36), अर्जून नरेश बारसाय पोया (25), छाया उर्फ राजे देवू कुळयेटी (23) व विनु उर्फ रामनाथ उर्फ बिजावू सुंदर कोवाची (22) अशी आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांची नावे असून प्रभारी पोलिस अधीक्षक राजा आर., अपर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी , अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले आहे.सैनु उर्फ मिरगु झुरू वेळदा हा 2001 पासून कसनसूर एरिया प्लाटून क्रमांक 3 मध्ये भरती होवून मार्च 2008 मध्ये कंपनी क्रमांक 4 च्या प्लाटून ए कमांडर म्हणून पदोन्नती झाली. त्याचा एकूण 36 पोलिस - नक्षल चकमकीत समावेश होता. 11 ब्लास्टींग , 17 खून, 4 जाळपोळ व 3 अपहरणाचे गुन्हे दाखल असून शासनाने 12 लाखांचे बक्षिस जाहिर केले होते.

रूपी उर्फ झुरी कांडे नरोटे ही डिसेंबर 2003 ला कसनसूर दलममध्ये भरती होवून 2008 पासून कंपनी क्रमांक 4 सी प्लाटून कमांडर म्हणून कार्यरत होती. तिच्यावर 42 चकमकी, 7 ब्लास्टींग, 8 खून, 2 जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने 6 लाखांचे बक्षिस जाहिर केले होेते.अर्जून पोया हा सप्टेंबर 2011 ला टिपागड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. मार्च 2014 पासून प्रेस टीम सदस्य म्हणून तो कार्यरत होता. त्याचा एकूण 5 पोलिस - नक्षल चकमकींमध्ये सहभाग होता. 1 खून व 1 जाळपोळीचा गुन्हासुध्दा त्याच्यावरी दाखल असून 6 लाखांचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते.छाया उर्फ राजे देवू कुळयेटी ही ऑगस्ट 2011 ला भामरागड दलममध्ये भरती होवून मार्च 2015 पर्यंत साउथ डिव्हीजन सीएनएम टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर पाच चकमकी, 3 खून, 8 जाळपोळीचे गुन्हे दखल आहेत. तिच्यावर 2 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते.

विनु उर्फ रामनाथ उर्फ बिजावू सुंदर कोवाचही हा जून 2011 ला टिपागड एलओएस मध्ये सदस्य पदावर भरती होवून डिसेंबर 2016 पासून डिव्हीसी जोगन्ना याचा गार्ड म्हणून काम करीत होता. त्याचा 6 पोलिस नक्षल चकमकी, 2 खून, 7 जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभाग आहे. शासनाने 2 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.
सैनु वेळदा व रूषी नरोटे यांचा आणि अर्जून पोया व छाया कुळयेटी यांचा विवाह झाला आहे. वरिष्ठ नक्षली आपली विचारसरणी लादून स्वतःचा फायदा करण्यात गुंतलेले असून माओवादी चळवळीमुळे संपुर्ण भागाचा विकास खुंटला आहे, असे मत आत्मसमर्पीत नक्षल्यांनी व्यक्त केले. यापुढे चांगल्या पध्दतीने जीवन जगण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. 2017 - 18 या वर्षात आतापर्यंत 27 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.