Breaking News

जिल्हा निर्मितीसाठी विखे-थोरातांची समन्वय समिती स्थापन करा : मुनगंटीवार

पंधरा वर्षे मंत्रीपद असणारा संगमनेर तालुका आहे. त्यामुळे जिल्हा निर्मितीचा प्रश्न माझ्या एकट्यावर सोडू नका. मी अर्थमंत्री असून जिल्हा विभाजनाचा विषय माझ्या विभागाचा नाही. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा कोणता करायचा, हे ठरविण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि आ. बाळासाहेब थोरात यांची समन्वय समिती स्थापन करावी. त्यातून जो जिल्हा जन्माला येईल, त्यावर मी तुमच्या पाठीशी उभा राहील, अशी मिश्कील टिपण्णी राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली.

येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त सुवर्णा मालपाणी, बीव्हिजी समुहाचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, अध्यक्ष बिहारीलाल डंग, सचिव सीए. नारायण कलंत्री, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक यासारखी माध्यमे २१ व्या शतकातील अज्ञान पसरवणारी सर्वात मोठी संशोधने ठरली आहेत. समाजाच्या प्रगतीऐवजी अशा माध्यमात आपली श्रमशक्ति खर्च होत आहे. सेल्फी काढता काढता आपण सेल्फीश बनलो आहोत. समाज माझ्यासाठी काय करेल, यापेक्षा मी समाजासाठी काय करु शकतो, ही भावना महत्वाची असते. अशावेळी शिक्षण प्रसारक संस्थेसारख्या ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेमधे मालपाणी परिवाराचे काम पाहून निश्‍चितच आनंद होतो. आमदार डॉ. तांबे म्हणाले, संगमनेरच्या विकासात मालपाणी परिवाराने महत्वाची भूमिका बजावली. राज्यात संगमनेरची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम संगमनेर महाविद्यालयाने केले आहे. हे महाविद्यालय आमचा मानबिंदू आहे. पालकमंत्री शिंदे म्हणाले, छोटे राज्य व जिल्हे झाले पाहिजेत, हा आपला आहे. नव्या जिल्हा निर्मितीकडे आम्ही सकारात्मक दुष्टीने पाहतो. राज्यात सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न गेल्या २५ वर्षांपासून रखडला आहे. तो निकालात काढणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, विद्यापीठाने ‘कमवा व शिका’ योजनेच्या अनुदानात कपात केली. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी ललिता मालपाणी यांनी १ लाख रुपए देत स्वाभिमान कोष सुरू केला होता. हा कोष १० लाख रुपए इतका असून त्यात मालपाणी परिवाराच्यावतीने ४० लाख रूपयांची भर देगणी स्वरूपात दिल्याची घोषणा डॉ. मालपाणी यांनी केली. सूत्रसंचालन सचिन पलोड व श्रीहरी नावंदर यांनी केले. प्राचार्य देशमुख यांनी आभार मानले.

मुख्यालयासाठी संगमनेर सोयीस्कर 
संगमनेर जिल्हा कृती समितीच्यावतीने अर्थमंत्री मुनगंटीवार व पालकमंत्री शिंदे यांना संगमनेर जिल्हा व्हावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी कृती समितीकडून सादर केलेल्या अल्बमचे कौतुक करताना पालकमंत्री राम शिंदे यांनी संगमनेर तालुका ३६० अंशात जिल्हा विभाजनाच्या मुख्यालयासाठी कसा सोयीस्कर असल्याचे दाखविले आहे.