Breaking News

अंगणवाडी सेविकांच्‍या प्रश्‍नांसाठी लढा सुरुच राहील : विखे


विरोधी पक्षांचा दबाव आणि अंगणवाडी सेविकांच्‍या संघटनांनी दाखविलेल्‍या एकजुटीमुळेच सरकारला ‘मेस्‍मा’ कायदा मागे घ्‍यावा लागला. भविष्‍यातही अंगणवाडी सेविकांच्‍या प्रश्‍नांसाठी आपला लढा सुरुच राहील, अशी ग्‍वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील दिली.

अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा सरकारला मागे घ्यावा , यासाठी विरोधी पक्षनेते विखे यांनी विधानसभेत बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल अंगणवाडी सेविका संघटनांच्या कृती समितीने लोणी येथे त्यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी कृती समितीचे पदाधिकारी आणि अंगणवाडी सेविकांशी विरोधी पक्षनेत्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की अंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा मागे घ्यावा, म्हणून पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आक्रमक भूमिका घेतली होती. या मागणीसाठी सभागृहाचे कामकाजही आम्‍ही बंद पाडले. अंगणवाडी सेविका संघटनांनी या मागणीसाठी दाखविलेली एकजूटही महत्त्वपूर्ण होती. विरोधी पक्षाच्या दबाव आणि अंगणवाडी संघटनांची एकजुट यामुळेच सरकारला अखेर झुकावे लागले. 

महाराष्‍ट्र राज्‍य कृती समितीचे सरचिटणीस कॉ.राजेंद्र बावके यांच्‍या नेतृत्‍वाखाली कॉ. शदर संसारे, कॉ. मदिना शेख, माया जाजू, सुजाता शिंदे, निर्मला चांदेकर, शोभा पटेकर, विमल वांढेकर, हिरा तुपे, मिरा तुपे, प्रमिला विधाटे, संगिता गोसावी, शारदा मोठे, सुवर्णा काळे, चंद्रकला काळे, सिंधू सगळगिळे, शकुतंला बेलदार, रतन ढवळे, नंदा तुपे, अनिता मगर, दिपाली माने आदी उपस्थित होते.