Breaking News

पालिकेने अवैध बांधकामांना अभय दिल्यासारखी परिस्थिती !


सातारा: कोणीही उठावे आणि नियम-अटी धाब्यावर बसवून बांधकामे उभारावित, अशी दयनीय परिस्थिती शहरात सुरु असून यावर पालिकेचा कसलाच अंकुश राहिला नसून शहराचे विद्रुपीकरण होत असून याचा परिणाम म्हणून पालिकेतील अधिका-यांचे अर्थार्जन मात्र वाढले आहे. त्यामुळे एकंदरीत पालिकेने अवैध बांधकामांना अभय दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी गोरे या भस्मासुराला रोखण्यात फेल ठरल्यामुळे अवैध बांधकामांचा चेंडू जिल्हाधिका-यांच्या दालनात असून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनीच ठोस कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी सोळवंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सोळवंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, संपूर्ण शहरातील अवैध बांधकामांचा गंभीर प्रश्‍न प्रलंबित असताना सदरबझार, गुरुवार, शनिवार पेठेसह पालिकेच्या नजीक कोणतीही परवानगी न घेता राजरोस बांधकामे सुरु असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले तरी कलम 52-53 अंतर्गत नोटीस बजावण्यापलीकडे पालिकेचे कर्मचारी विशेष काही करत नाहीत. 

अवैध बांधकामे करताना टीपी-पालिकेची परवानगी नसेल तर लोकांचे धाडस कसे होते? या प्रश्‍नाच्या खोलात अधिका-यांचे बरबटलेले हातच कारणीभूत असल्याचे उघड होत आहे. कागदी घोडे नाचवताना कारवाईची इशारा पालिकेकडून दिला जातो, पुढे काही होत नाही. लोकांच्या हे अंगवळणी पडले असून याच भानगडबाजांचा फायदा घेत नव्याने कायदा धाब्यावर बसवून अवैध बांधकामे बोकाळत आहेत. शनिवार पेठेतील मुख्य रस्त्यावर भरत ट्रेडिंग कंपनी, सदरबझार येथे जाधव बिल्डरकडून टोलेजंग बांधकाम उभारले जात असून अशा बांधकामांना कोणाचा वरदहस्त आहे? पालिका कारवाई का क रीत नाही? असे सवाल पक्ष-संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करीत असून सर्वसामान्य नागरिकांना एक आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.