Breaking News

वाठार स्थानक पोलीसही पाणी फाउंडेशनच्या कामासाठी सज्ज


सातारा, वाठार स्थानक प्रमुख बाजारपेठ आहे. कायम पाण्यासाठी वंचित असे गाव म्हणून वाठार स्थानकाची ओळख आहे. उन्हाळा असो की पावसाळा गावाला पाण्याचे टँकर हे चालू असणारच हे जणू समीकरणच बनले आहे. यात्रा काळात तर पै-पाहुणे वाठार स्थानकाला येताना पाण्याचीच चिंता व्यक्त करत असतात. गावातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.

या पाणी टंचाईमुळे वाठार स्थानकामधील नागरिक पुरते बेजार झालेले आहेत. पाणी फाउंडेशनच्या अनपटवाडी येथील ट्रेनिंगला वाठार स्थानक पोलीस ठाण्याचे स.पो.नि.मयूर वैरागकर ,युवा नेते नागेशशेठ जाधव,माजी सरपंच अमोल आवळे,विद्यमान सरपंच बाळासाहेब जाधव यांनी हे प्रशिक्षण घेतले व आता वाठार स्टेशनचा दुष्काळी गावाचा कलंक मिटवून पाणीदार वाठार यामार्गाने वाठार स्थानकाची वाटचाल सुरू झाली आहे.
 
युवा नेते नागेशशेठ जाधव यांनी सांगितले की, वाठार स्थानका हे जिल्ह्यातील शांत व संयमी गाव म्हणून ओळखले जाते. राजकीय पटलावर देखील उत्तर कोरेगाव तालुक्यातील मोठ्या लोक संख्येचे गाव आहे. पाणी फाउंडेशन सारखा पाणीदार उपक्रम राबविण्यात वाठार स्थानकामधील सर्व युवावर्ग,ज्येष्ठ महिला- भगिनींनी तसेच गावातील सर्वांनी गट- तट, हेवे- दावे बाजूला सारून गाव पाणीदार करण्यासाठी एकत्र येऊन वाठार स्टेशनचा असणारा दुष्काळी गाव हा कलंक मिटवून टाकू, असे आवाहन नागेशशेठ जाधव यांनी केले.माजी सरपंच अमोल आवळे यांनी तर गाव पाणीदार बनवण्यासाठी एक व्हाट्सप ग्रुप बनविला आहे व या ग्रुपचे नाव पाणी फाउंडेशन वाठार असे ठेवण्यात आले आहे.

ग्रामदैवत असणा-या निष्णाई मातेच्या मंदिरामध्ये यात्रेनिमित्त बैठक घेतली जाते. यामध्ये यावर्षी प्रामुख्याने पाणी फाउंडेशन वॉटर कप बद्दलच विषय घेण्यात आला होता. दर वर्षी यात्रेला मनोरंजनाचे असणारे दोन कार्यक्रम असतात यावर्षी एक कार्यक्रम करण्याचे आयोजित केले आहे. यावर्षी हा खर्च कमी करून पाणी फाउंडेशनवरती करण्याचे योजले गेले. लवकरच यावर पाणी फाउंडेशनच्या विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले जाणार आहे त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशन या विषयावर ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे.