Breaking News

शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक मदत करा : आ. थोरात


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर शासनाचे लक्ष वेधले. भाजपा सरकारच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी कडवट टीका केली. यावेळी महसूल, कृषी, दुग्ध, शेती आणि शेतकरी अशा सर्व विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करतांना त्यांनी शेतकर्‍यांना जाणीवपूर्वक मदत करा, असे सत्ताधारी भाजप सरकारला आवाहन केले.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खातेनिहाय चर्चेत आ. थोरात यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी झालेल्या भाषणात आ. थोरात म्हणाले, खातेनिहाय चर्चा ही विधानसभेची परंपरा आहे. यामुळे संबंधित मंत्र्याला केलेल्या कामाचा आढावा सदनात व जनतेसमोर मांडता येतो. परंतु सध्या या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, ही चिंतेची बाब आहे. जुन्या खरेदी करतांना अनावश्यक बाबी दूर केल्या पाहिजे. शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या शासकीय जमिनींबाबत मंजुरी, न्यायालयीन खटले, विविध अडथळे याबाबतची योग्य तपासणी करुन शुल्क आकारणी करावी. तसेच कुटूंबात मालमत्ता हस्तांतरण सुरळीत व अगदी माफत शुल्कात झाले पाहिजे.

भाजपा सरकार हे फक्त घोषणा व जाहिराती करीत आहे. शेतकरी व सामान्यांबाबत हे शासन पूर्णपणे उदासीन आहे. काँग्रेस आघाडी सरकारने जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्याचे या. थोरात म्हणाले. कृषी, महसूल, दुग्ध, साखर उद्योग, शेतकर्‍यांच्या विविध समस्या यांची अभ्यासपूर्ण मांडणी करतांना मुख्यमंत्री, विविध मंत्री व सर्वपक्षयीय आमदारांनी काँग्रेसनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या भाषणाला दाद दिली.