Breaking News

लेखापालाच्या विषयावर माफीनाम्यानंतर पडदा! नगरपरिषदेची सभा खेळीमेळीत


नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. मुख्याधिकारी सचिन बांगर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार आदींसह नगरसेवक व विविध विभागाचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. काही विषयावरुन नगरसेवकांना असलेल्या अधिकारावरुन पेच निर्माण झाल्याने सभेट वादळी चर्चा झाली. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे लक्ष लागलेल्या लेखापालाच्या विषयावर माफीनाम्यानंतर पडदा पडला. बराचवेळ सुरु असलेल्या या बैठकीत शहर विकासाच्यादृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या सभेत ४३ विषयांवर चर्चा होऊन ते मंजुरीस ठेवण्यात आले होते. ज्यात २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मार्केट कर वसुलीचा ठेका वादग्रस्त ठरल्याने यावर्षी पुन्हा नव्याने हा ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम विभागाची कामे पारदर्शकपणे होण्यासाठी सर्व्हेअरची मदत घेणे, सावरकर मंगल कार्यालयाच्या सभागृहात वाचनालयाच्या फर्निचरसाठी मंजुरी, महत्वाचा ठरणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कचरा संकलन आणि वाहतुक करणे, स्विपींग आणि गटार साफ करण्यासंबधीची कामे बाह्य एजन्सीकडून करुन घेणे आदी विषयावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी नगरसेवक सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी उत्तरे दिली.