Breaking News

बहुजननामा सोळावी खेप......! जातीअंताच्या चळवळीतील एक टप्पा - ओबीसी जनगणना ...!

बहुजनांनो.... ! 
अत्यंत त्रासातून, मोठमोठे अडथळे पार करीत, गेल्या 7 महिन्यापूर्वी जाहीर केलेली धुळ्याची ओबीसी जनगणना परिषद एकदाची 11 मार्चला संपन्न झाली. याचे सर्व श्रेय अर्थातच मुख्य संयोजक दिलिप देवरे यांच्या टिमवर्कचे आहे. ओबीसी जातीतील बहुतेक सर्वच कार्यकर्त्यांची धाव ‘वधू-वर सूचक’ मेळाव्यापर्यंतच असते. हा कार्यकर्ता जातीतून बाहेर पडून व्यापक ओबीसीकरणापर्यंत यायला खूप उशीर करतो. परंतू तरीही त्याची मानसिकता मात्र पूर्णपणे ओबीसी झालेली आहे. जातीचे वधू-वर मेळावे घेण्याईतके सोपे ओबीसी कार्यक्रम घेणे नाही, हे एकदाचे त्यांच्याही लक्षात आलं.

या ओबीसी जनगणना परिषदेला विविध राजकीय पक्षांचे आमदार, खासदारांनी यावेत यासाठी आयोजकांकडून प्रयत्न करण्यात आलेत. मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या ओबीसी आमदार-खासदारांची ‘ओबीसी’ विषयक उदासिनता व त्याच पक्षाच्या उच्चजातीय नेत्यांची ‘ओबीसी’ विषयक ‘सतर्कता’ यामुळे अनेकवेळा भेटूनही हे नेते यायला तयार नव्हते. या मेळाव्याला उपस्थित राहणे म्हणजे येत्या असेंब्ली-पार्लमेंटच्या अधिवेशनात ‘ओबीसी जनगणनेसाठी ठराव मांडणे’, याची त्यांना पूर्णपणे कल्पना देण्यात आलेली होती. आणी पक्षाचे उच्चजातीय नेते याला परवानगी देणार नाहीत याचीही पूर्ण कल्पना या ओबीसी आमदार-खासदारांना होती. त्यामुळे ईकडे आड तिकडे विहीर अशा कचाट्यात सापडलेल्या या धुर्त नेत्यांनी ओबीसी जनगणना परिषदेला उपस्थित न राहणेच पसंद केलं. त्यामुळे आयोजकांनी निर्णय घेतला की विविध पक्षांच्या दुसर्या फळीतील स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत ही परिषद घ्यावी. हे स्थानिक ओबीसी नेतेच हा विषय पुढे रेटतील व आपापल्या लोकप्रतिनिधींना ओबीसी जनगणनेसाठीच्या ठरावासाठी तयार करतील.
या परिषदेला एकमात्र ब्राह्मण नेते संजय शर्मा होते. ते समाजवादी, कम्युनिस्ट व पुरागामी असते तर, फारशी कुणाची हरकत नसती. मात्र ते भाजपाचे प्रवक्ते असल्याने बर्यााच (पुरोगामी) मित्रांनी प्रतिप्रश्‍न केलेत. अशावेळी आपले पुरोगामी मित्र सोयिस्करपणे फुले-आंबेडकरी भुमिका विसरतात. तात्यासाहेब महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मण मित्रांचे सहकार्य घेऊन आपली जातीअंताची चळवळ केली. हे ब्राह्मण मित्र कट्टर पुरोगामी होते म्हणून ते फुले-आंबेडकरांचे मित्र होते, असे नाही. काही विशिष्ट प रिस्थीतीच्या दबावाखाली काही गोष्टी घडत असतात. ब्राह्मण मित्राच्या हातून मनुस्मृती जाळून घेणे वा ब्राह्मण मित्राच्या घरातच मुलींची पहिली शाळा सुरू करणे हा केवळ डावपेचाचा भाग नव्हता, तो धोरणाचा भाग होता. अपादर्शक व कडेकोट भींतींच्या या जातीव्यवस्थेला छोटे-छोटे धक्के मारणेही क्रांतिकारक ठरते. अशा घटनांमधून दोन कडक संदेश जातात. पहिला संदेश ब्राह्मणांना जातो. ‘तुम्ही म्हणता तेवढी पक्की तुमची व्यवस्था नाही’, अशा संदेशातून प्रतिगामी ब्राह्मणांचे नितीधैर्य खच्ची होते. दुसरा संदेश ब्राह्मणी दहशतीतील भित्र्या शूद्रादिअतिशूद्रांना जातो. ब्राह्मणांच्या हातून एखादे जातीविरोधी कामाचे उद्घाटन करून घेतले की, भित्र्या शूद्रादिअतिशूद्रांची भीड चेपते व त्यांचे मनोधैर्य उंचावते.
आमचे फुलेआंबेडकरी मित्र क्रांतीच्या खूप गप्पा करतील मात्र क्रांतीसाठी आवश्यक केडरयुक्त पक्ष, तत्वज्ञान, धोरण, डावपेंच, कार्यक्रम व त्यांची शिस्तबद्ध अमलबजावणी वगैरे गोष्टींचा त्यांना सुगावाही नसतो. निर्णय प्रक्रिया किती लोकशाहीवादी व किती मर्यादित असावी, याचेही त्यांना भान नसते. जातीअंताच्या लढ्यात कोणत्या जातीचे काय स्थान आहे व त्या स्थानाप्रमाणे त्या जातीला कसे क्रिया-प्रवण करावे, याचा मागमूस कोणाच्याही डोक्यात नाही. जातीअंताच्या निर्णय प्रक्रियेत ब्राह्मण आला व ओबीसी बाहेर पडला तर, त्या पक्षाची काय अवस्था होते, हे बसपाच्या उदाहरणावरून आजही कोणी शिकायला तयार नाही. सरसकट सर्व ब्राह्मण प्रतिगामी व सरसकट सगळे बहुजन क्रांतीकारी अशी धोपट भुमिका तुम्हाला काही काळानंतर दुसर्याव टोकाला घेऊन जाते. शेवटी कोणत्या प्रसंगी काय करावे व ते केल्याने पुढील परिणाम-दुष्परिणामांबद्दल सतर्क राहणे, हाच तर नेत ृत्वाचा मोठा गुण असतो. सर्वच प्रश्‍नांची उत्तरे महापुरूषांच्या पुस्तकात नसतात. अलिकडे संविधानाच्या पुजाअर्चा व मिरवणुका सुरू झाल्या आहेत.
ओबीसी जनगणनेच्या परिषदा, सभा वगैरे देशभर सुरू झाल्या आहेत. 11 एप्रिलपासून फुलेवाड्यापासून प्रेरणा घेऊन ओबीसी जनगणा अभियान राज्यभर जाणार आहे. दिक्षाभुमीवरू न ते चैत्यभुमीवर जाऊन त्याचा समारोप होणार आहे. या राज्यस्तरीय ओबीसी जनगणना अभियानाला मोठ्याप्रमाणात सहभाग देऊन जातीअंताच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन करून थांबतो. 
सत्य की जय हो !!