Breaking News

विमल जाधव यांचे कार्य महिलांना प्रेरणादायी - छ. वेदांतिकाराजे भोसले


सातारा , दि. 16, मार्च - आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. जाधव कुटूंबीयांची गेल्या 84 वर्षांची दुर्गा खानावळ विमल जाधव यांनी मोठ्या हिमतीने चालू ठेवून एक आदर्श घालून दिला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जाधव या त्यांच्या खानावळीत 8 मार्चला महिलांसाठी मोफत भोजन दिले. ही परंपरा त्यांनी सलग 15 वर्षांपासून जपली असून जाधव यांचे कार्य महिलांना निश्‍चित प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले. 
वाठार स्टेशन येथील दुर्गा खानावळीच्या संचालिका विमल जाधव यांचा आदर्श महिला म्हणून कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने सन्मान करण्यात आला. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते जाधव यांना साडीचोळी भेट देवून गौरवण्यात आले. याप्रसंगी वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी कर्तव्य सोशल ग्रुपच्या सर्व महिला सदस्या आणि श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशिय महिला बचतगट फे डरेशनच्या सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. 
वेदांतिकाराजे म्हणाल्या, कोणतेही काम छोटे नसते. ग्रामीण भागातील महिलांना आपली रोजीरोजी चालवण्यासाठी, कुटूंबाला हातभार लावण्यासाठी प्रसंगी मजुरी करावी लागती. आजच्या स्पर्धेच्या युगात महिलांना घराबाहेर पडून विविध क्षेत्रात काम करण्याशिवाय पर्याय नाही. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा आदी सर्वप्रकारच्या क्षेत्रात महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. ही तमाम महिलांसाठी अभिमानाची बाब आहे. विमल जाधव यांच्यासारख्या अनेक महिला संसाराचा गाडा चालवण्यासाठी खानावळीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. व्यवसाय सांभाळतानाच सामाजिक बांधिलकीचा विसर न पडता गेली 15 वर्ष सातत्याने त्या महिलदिनी येणार्या सर्व महिलांना मोफत भोजन देत आहेत. यंदाच्या महिला दिनी त्यांच्या खानावळीत तब्बल 1 हजार 600 महिलांना मोफत जेवण देण्यात आले. यावरुनच जाधव आणि त्यांच्या कुटूंबीयांचे समाजप्रेम दिसून येते.