Breaking News

पाच वर्षात 25 हजार गावे पाणी टंचाईमुक्त करणार - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 16, मार्च - शासनाने जलयुक्त शिवार हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून पाच वर्षात राज्यातील 25 हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ऍक्सीस बँक फाऊंडेशन तर्फे आयोजित शाश्‍वत विकासातील भागीदारी या विषयावरील तिसर्‍या वार्षिक परिषदेचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँकेचे चेअरमन एस रामदोराई, बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शिखा शर्मा, माजी सीईओ सी बाबू जोसेफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्र संघाने शाश्‍वत विकासाची 17 ध्येय निश्‍चित केली आहेत. भारताने आणि महाराष्ट्राने ना केवळ यात सहभाग नोंदवला पंरतू या ध्येय पुर्ततेसाठी पाऊले उचलण्यास देखील सुरुवात केली आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याचे जुने स्त्रोत पुनरुज्जीवित करण्याला प्राधान्य दिले आहे. जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत 11 हजार गावे पाणीटंचाईमुक्त करण्यात आली आहेत. यावर्षी आणखी 5 हजार गावांची त्यात भर पडणार आहे. वेगवेगळे ट्रस्ट, संस्था-स्वंयसेवी-सामाजिक संस्था आणि लोकांच्या सहभागातून हा कार्यक्रम राबविला जात असल्याने आता हा शासनाचा नाही तर लोकांचा कार्यक्रम झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात 1 हजार गावांना स्मार्ट गावे करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. कमी मानव विकास निर्देशांक असलेल्या या 1 हजार गावांच्या सोशल ट्रॉन्सफॉर्मेशनमध्ये कॉर्पोरेटस, स्वंयसेवी संस्था आणि लोकांचा सहभाग घेतला गेला आहे. खाजगी क्षेत्राची नाविन्यशीलता, तंत्रज्ञानाची जोड शासकीय यंत्रणेला मिळाली तर हे काम 2 ते 3 वर्षात पूर्णत्वाला जाऊ शकेल असेही ते म्हणाले.
रोजगाराच्या क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, असंतुलित विकास, लिंगभेद,प्रगतीच्या दर्‍या या पर्यायी उत्पन्नाच्या साधनांच्या विकासातून सांधता येणार आहेत. त्यासाठी अशी पर्यायी उत्पन्नाची साधने विकसित होणे गरजेचे आहे. काही जणांमध्ये समाजाला परत करण्याची क्षमता असते, परंतू त्यांच्याकडून फारसे योगदान होतांना दिसत नाही. परंतू ऍक्सीस बँक फाऊंडेशने एक दशलक्ष कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनामानात सुधारणा करण्याचा केलेला प्रयत्न निश्‍चित कौतूकास्पद आणि अभिनंदनीय आहे. ऍक्सीस बँक ही देशातील सर्वात जलदगतीने विकसित होणारी बँक आहे. ध्येय निश्‍चित करणे महत्वाचे असते. परंतू ते साध्य करणे त्यापेक्षाही महत्वाचे असते. येत्या पाच वर्षात बँकेने 2 दशलक्ष कुटुंबापर्यत पोहोचण्याचा आणि त्यांच्या जीवनोन्नतीचा संकल्प केला आहे. तेही अभिनंदनीय आहे. 
सामाजिक विकासाच्या त्यांच्या या कार्यात शासन कुठल्याही टप्प्यावर बँकेसोबत सहभागी होण्यास तयार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी शाश्‍वत विकासाची 17 ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू या, असे आवाहन देखील केले.
बॅकेच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शिखा शर्मा यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून बँक ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी, करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.